अजिंक्य म्हणजे न हरणारा. नावाला साजेशा विक्रमासह अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टेस्ट क्रिकेटमधला एक दुर्मीळ विक्रम अजिंक्यच्या नावावर आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात खेळलेल्या अजिंक्यने सहा टेस्टमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. सहाही टेस्टमध्ये एकदाही भारताचा पराभव झाला नाही.
३८ कर्णधारांनी टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं. यापैकी केवळ चारच कर्णधारांच्या नावावर एकाही पराभवाची नोंद नाही. यामध्ये अजिंक्यसह कृष्णम्माचारी श्रीकांत, रवी शास्त्री, हेमू अधिकारी यांचा समावेश आहे. योगायोग म्हणजे वनडेतही रहाणेने काही सामन्यात नेतृत्वाची धुरा सांभाळली. वनडेत २८ कर्णधारांनी भारताचं नेतृत्व केलं. यापैकी केवळ चारच कर्णधारांनी वनडे गमावलेल्या नाहीत. अजिंक्यच्या बरोबरीने गौतम गंभीर, अनिल कुंबळे आणि मोहिंदर अमरनाथ यांचा समावेश आहे.
धरमशाला विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१७)
२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. विराट कोहली उपलब्ध नसल्याने दौऱ्यातल्या शेवटच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे भारताचं नेतृत्व सोपवण्यात आलं. धरमशाला इथे झालेल्या या टेस्टमध्ये रहाणेने कुलदीप यादवला पदार्पणाची संधी दिली. कुलदीपने चार विकेट्स पटकावत रहाणेचा विश्वास सार्थ ठरवला. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथच्या शतकाच्या बळावर ३०० धावा केल्या. पदार्पणवीर कुलदीप यादवने ४ विकेट्स पटकावल्या. भारताने ३३२ धावांची मजल मारली.
केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लॉयनने ५ विकेट्स घेतल्या. भारताच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाने शरणागती पत्करली आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १३७ धावांतच आटोपला. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. १०६ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने केएल राहुल (नाबाद ५१) आणि रहाणे (नाबाद ३८) यांच्या संयमी खेळीच्या बळावर गाठलं. ६३ धावा आणि ४ विकेट्स पटकावणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
बंगळुरू विरुद्ध अफगाणिस्तान (२०१८)
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी अजिंक्यकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. भारतीय संघाने अफगाणिस्तान संघावर डावाच्या फरकाने मोठा विजय मिळवला. सामना संपल्यानंतर जेतेपदासह भारतीय संघ फोटो काढत असताना अजिंक्यने अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही सहभागी करून घेतलं. या खेळभावनेसाठी अजिंक्यचं अफगाणिस्तानचे खेळाडू आणि बोर्डाने कौतुक केलं.
मेलबर्न विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२०)
भारताच्या या ऑस्ट्रेलियात दौऱ्यात पहिल्या टेस्टमध्ये अॅडलेड इथे नामुष्की ओढवणाऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भारतीय संघाचा ३६ धावात ऑलआऊट झाला होता. या टेस्टनंतर पॅटर्निटी लिव्हसाठी कोहली मायदेशी परतला. रहाणेकडे संघाची धुरा आली. संघाचं मनोधर्य उंचावण्याचं महत्त्वाचं काम रहाणेने केलं. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांतच आटोपला. जसप्रीत बुमराहने ४ तर रवीचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अजिंक्यच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने ३२६ धावांची मजल मारली. अजिंक्यने ११२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०० धावा केल्या. भारतीय संघाला ७० धावांचं लक्ष्य मिळालं. शुबमन गिल आणि अजिंक्यने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अजिंक्यला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सिडनी वि. ऑस्ट्रेलिया (२०२१)
हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चिवट झुंज देत टेस्ट मॅच ड्रॉ केली आणि भारताने पराभव टाळला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांची मजल मारली. स्टीव्हन स्मिथने १३१ तर मार्नस लबूशेनने ९१ धावा केल्या. भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला. लबूशेन, स्मिथ आणि कॅमेरुन ग्रीन यांनी अर्धशतकी खेळी केल्या. भारताला विजयासाठी ४०७ धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालं. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी खेळी केल्या. ऋषभ पंतने ९७ धावांची वेगवान खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर विहारी-अश्विन जोडीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा झेलत चिवटपणे झुंज दिली. विहारीने १६१ चेंडूत २३ तर अश्विनने १२८ चेंडूत ३९ धावांची कूर्म खेळी केल्या.
ब्रिस्बेन वि. ऑस्ट्रेलिया (२०२१)
ऋषभ पंतच्या ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने संस्मरणीय विजय साकारला. दुखापतींचं ग्रहण लागलेल्या या मालिकेत प्रत्येक टेस्टगणिक खेळाडू जखमी होऊन बाहेर पडत होते. मात्र अजिंक्यने हार मानली नाही. लबूशेनच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३६९ धावा केल्या. भारताने ३३६ धावा करत टक्कर दिली. वॉशिंग्टन सुंदर (६२) आणि शार्दूल ठाकूर (६७) यांनी शानदार खेळी साकारल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने ५ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २९४ धावांची मजल मारली. मोहम्मद सिराजने ५ विकेट्स घेण्याची करामत केली. शार्दूलने ४ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. भारतीय संघाला ३२८ धावांचं लक्ष्य मिळालं. शुबमन गिलने ९१ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. चेतेश्वर पुजाराने ५६ धावा करत आशा जिवंत राखल्या. ऋषभ पंतने नाबाद ८९ धावांची खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऋषभलाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
कानपूर वि. न्यूझीलंड (२०२१)
मुंबईकर श्रेयस अय्यरची पदार्पणाची टेस्ट.श्रेयसने पदार्पणात शतकी खेळी साकारली आणि भारतीय संघाने ३४५ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीने ५ विकेट्स पटकावल्या. न्यूझीलंडने २९६ धावा केल्या. अक्षर पटेलने ५ विकेट घेतली. भारताने दुसरा डाव २३४ धावांवर डाव घोषित केला. श्रेयसने ६५ तर वृद्धिमान साहाने ६१ धावा केल्या. भारताने न्यूझीलंडला २८४ धावांचं लक्ष्य दिलं. न्यूझीलंडने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १६५ धावा करत टेस्ट ड्रॉ केली. श्रेयसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
