5 Wickets In 1 Over: टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. कारण फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे गोलंदाजी करताना २ किंवा ३ गडी बाद करणं ही कुठल्याही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट असते. पण जर एखाद्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली, तर मग सोन्याहून पिवळं होऊन जातं. पण टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना इंडोनेशियाच्या गोलंदाजाने एकाच षटकात ५ गडी बाद करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
इंडोनेशिया आणि कंबोडिया या दोन्ही संघांमध्ये ८ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ डिसेंबरला बालीमध्ये पार पडला. या सामन्यात कंबोडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी इंडोनेशियाकडून धर्म केसमाने दमदार शतकी खेळी केली. त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंडोनेशियाने ५ गडी बाद १६७ धावांचा डोंगर उभारला.
इंडोनेशियाच्या गोलंदाजाची विक्रमी कामगिरी
कंबोडियाला हा सामना जिंकण्यासाठी १६८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कंबोडियाने १४.३ षटकांपर्यंत १०४ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंडोनेशियाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी २८ वर्षीय गेडे प्रियांदना गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीच्या ३ चेंडूंवर त्याने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. यासह त्याने हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने आणखी २ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात ५ गडी बाद करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी महिला आणि पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाला एकाच षटकात ५ गडी बाद करता आले नव्हते.
प्रियांदनाने ५ गडी बाद करताना केवळ १ धाव खर्च केली. त्याने एक वाईड चेंडू टाकला होता. या सामन्याआधी झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४ गोलंदाजांनी एकाच षटकात ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. याआधी टी-२० क्रिकेटमध्ये २ गोलंदाजांनी एकाच षटकात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. पण टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाने एकाच षटकात ५ गडी बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
