टोक्यो ऑलिम्पिक २०२१ स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अ‍ॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंची नावही या यादीत आहेत. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचही नावं आहे. पहिल्यांदाच ११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा,क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू रवि दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, सुमित अंतिल, अवनी लेखरा, कृष्णा नागर आणि मनीष नरवाल यांच्या नावाचा समावेश आहे.

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमुळे यंदा खेलरत्न पुरस्काराची घोषणा लांबणीवर पडली होती. गेल्या वर्षी ५ खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव मोठं करणाऱ्या ४ पदक विजेत्यांचा यात समावेश आहे. तर टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या ५ खेळाडूंचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीने ११ खेलरत्न पुरस्कारांसह ३५ अर्जून पुरस्कारांची घोषणा केली आहे.

भारतीय सैन्य अधिकारी २३ वर्षीय नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत देशाला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. रवि कुमार दहियाने ५७ वजनी फ्रिस्टाइल कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. तर टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे.