Rakesh Yadure 24 Lakh IPL Cyber Scam: आयपीएलच्या संघात खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देऊन १९ वर्षीय क्रिकटपटूची २४ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये राज्यपातळीवर खेळणाऱ्या राकेश यदुरेला राजस्थान रॉयल्सच्या संघात खेळण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मे २०२४ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या एका स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाचा रहिवासी राकेश यदुरेने आपल्या खेळीने निवडकर्त्यांना प्रभावित केले होते. यामुळे त्याला व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरच संधी मिळेल, असे सांगितले जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये यदुरेला इन्स्टाग्रामवर एक मेसेज आला, ज्यात त्याची राजस्थान रॉयल्सच्या संघात निवड झाल्याचे सांगण्यात आले. मेसेज पाठविणाऱ्याने त्याला एक अर्ज भरण्यास सांगितला आणि २००० रुपयांची नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले. यदुरेने २२ डिसेंबर २०२४ ते १९ एप्रिल २०२५ दरम्यान एकूण २३.५३ लाख रुपये भरले. संघात खेळण्यासाठी प्रत्येक सामन्याला ४० हजार ते ८ लाखांपर्यंत मानधन मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी अदुरेकडून पैसे लुबाडले.
सायबर चोरट्यांनी आश्वासन देऊनही यदुरेला किट बॅग, जर्सी आणि विमानाची तिकीटे मिळाली नाहीत. यानंतर सायबर चोरट्यांनी आणखी तीन लाखांची मागणी केल्यानंतर यदुरेला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. पैसे देण्यास उशीर झाल्यानंतर चोरट्यांनी यदुरेला इन्स्टा मॅसेंजरवर ब्लॉक केले. एका मोबाइल क्रमांकावरून अजूनही मेसेज येत होते. पण तेही आता बंद झाले.
यानंतर यदुरेने बेळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेद म्हणाले की, राकेश यदुरेचे वडील कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. आर्थिक अडचण असतानाही त्यांनी २४ लाख रुपये जमा केले होते.
गुलेद यांनी पुढे म्हटले, यदुरेने पाठवलेली रक्कम चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून काढून घेतली आहे. सध्या ते बँक खाते रिकामे आहे. प्राथमिक तपासानुसार सायबर चोरटे राजस्थानमधील असल्याचे कळत आहे. आम्ही आमचे सायबर पथक तिथे पाठवत आहोत.
राकेश यदुरेने या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस आमचे पैसे परत मिळवून देतील अशी आम्हाला आशा आहे. मी ज्या परिस्थितीतून गेलो, त्या संकाटत कोणीही अडकू नये, असे मला वाटते.