‘कॅचेस विन मॅचेस’ अशी क्रिकेटमध्ये म्हण आहे. ही म्हण आयपीएलच्या हंगामात सर्वार्थाने सिद्ध होते आहे. कॅचेस टाकल्यामुळे मॅचेस गमावण्याचं घाऊक प्रमाण समोर आलं आहे. जीवदान मिळाल्यानंतर बॅट्समन आणखी त्वेषाने तुटून पडत असल्याचं चित्र आहे.
आयपीएल संघांकडे कोचेसचा मोठा ताफा असतो. यामध्ये फिल्डिंग कोचचाही सहभाग असतो. सामन्यापूर्वी होणाऱ्या सराव सत्रात फिल्डिंगचाही सराव होता. बाऊंड्रीजवळचे रिले कॅचेस. नेहमीचे कॅचेस, रनआऊट्स, स्लिप कॅचेस या सगळ्याचा घोटून सराव होतो. मात्र तरीही यंदा कॅच सोडण्याचं प्रमाण घाऊक आहे. आयपीएलचे सामने कृत्रिम प्रकाशात खेळवण्यात येतात. प्रकाशाचा अंदाज न आल्याने किंवा प्रकाशाची तिरीप डोळ्यात गेल्याने कॅचेस सुटले आहेत. यंदाच्या हंगामात काही अफलातून कॅचेसही पाहायला मिळाले आहेत. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने पकडलेला कॅच हा स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचेसपैकी एक आहे.
‘फक्त षटकार मारण्याचा होतो सराव’
‘षटकार मारणे याला सर्वाधिक प्राधान्य असल्यामुळे फिल्डिंगचा सराव कमी झाला आहे’, असं मत भारतीय संघाचे माजी फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांनी व्यक्त केलं. ‘बॅट्समन पॅड घालून तयार होतात आणि षटकार खेचू लागतात. २० नेट बॉलर्स तय्यार असतात. सहा ते सात थ्रोडाऊन स्पेशालिस्ट असतात. बॅट्समन एकामागोमाग एक षटकार चोपू लागतात. असंख्य षटकार लगावून झाले की त्यांना लक्षात येतं की फिल्डिंगचाही सराव करायचा आहे. मग ते जाऊन पाच ते सहा कॅचेसचा सराव करतात. फिल्डिंगचा सराव केला नाही तर त्यांना जाहिराती मिळत नाहीत असं होत नाही किंवा त्यांच्या मानधनात घट होत नाही. षटकार आणि यॉर्कर लोकप्रिय आहेत’, असं श्रीधर यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं.
क्रिझविझने दिलेल्या डेटानुसार ४१ सामन्यांनंतर ३८२ कॅचेस उडाले आणि त्यापैकी १०४ सुटले. दहापैकी सहा संघांची झेल घेण्याची क्षमता ८० पेक्षा खाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने सर्वाधिक कॅचेस सोडले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाची क्षमता ६२.५ इतकी कमी आहे.
यंदाच्या हंगामात बॅट्समननी झळकावलेल्या ९ शतकांपैकी पाचजणांना जीवदान मिळालं आहे. जीवदानाच्या बळावरच या शतकवीरांना शतक रचलं आहे. ४१व्या सामन्यापर्यंत १० संघांची कॅच घेण्याची क्षमता ८०.२५ इतकी होती. सोप्या शब्दात सांगायचं तर १०० झेल उडाले असतील तर त्यापैकी २० सुटले आहेत. २०१८ पासूनची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. गेल्या हंगामात कॅच घेण्याची क्षमता ७५.८९ अशी होती.
इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे संघांना अतिरिक्त फलंदाज खेळवता येतो. २००पेक्षा जास्त धावा होणं नित्याचं झालं आहे. इतक्या धावांचा पाठलागही सहजतेने होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कॅच टाकणं म्हणजे पातक झालं आहे.
जीवदानं काय सांगतं?
कॅच सुटल्यानंतर संघांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. जीवदान मिळाल्यानंतर १८ इनिंग्जमध्ये बॅट्समनने ४० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यापैकी १४ सामन्यात म्हणजे ७८ टक्के वेळा कॅच सोडला गेलेल्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. झेल सुटल्यानंतर बॅट्समन किमान १७ धावा तरी करत आहेत. कॅच सोडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ पैकी ३ मध्ये पराभव झाला आहे. ज्याचा कॅच सुटला त्या खेळाडू दिमाखदार कामगिरी केल्याचं चित्र आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या शतकवीरांचा समावेश आहे.
गुजरात-आरसीबी लढतीत वॉशिंग्टन सुंदरने विराट कोहली शून्यावर असताना कॅच सोडला. हा कॅच गुजरातला चांगलाच महागत पडला.विराटने ४४ चेंडूत ८१ धावांची शानदार खेळी केली आणि आरसीबीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. पंजाबच्या शशांक सिंगने दिल्लीच्या के.एल.राहुलचा कॅच सोडला तेव्हा तो १२ धावांवर खेळत होता. राहुलने ६७ चेंडूत नाबाद १५२ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. दिल्लीचा संघ तरीही पराभूत झाला मात्र राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दिल्लीने प्रभसिमरन सिंगला आऊट करण्याची संधी सोडली. प्रभसिमरन त्यावेळी ६ धावांवर खेळत होता. त्याने ७६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरला २८ धावांवर जीवदान मिळालं. त्याने ७१ धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला विल जॅक्स आणि नमन धीर यांच्याकडून जीवदानं मिळाली. त्याने यांचा फायदा उठवत ३० चेंडूत ७६ धावांची आक्रमक खेळी केली.
२५ एप्रिलला झालेल्या दोन सामन्यात मिळून १६ कॅचेस सुटले. संपूर्ण दिवसभरात बॅट्समननी ९८६ धावा चोपून काढल्या.
