२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याच्या आरोपावरुन सुरु झालेल्या वादळावर आयसीसीने अखेरीस आपली प्रतिक्रीया दिली आहे. अंतिम सामना हा नियमाप्रमाणे खेळवला गेला, त्यात कोणत्याही प्रकारचा संशय घेतला जाईल असं कोणतंही कारण समोर आलेलं नसल्याचं, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल यांनी म्हटलं आहे.

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला होता. श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा, माजी खेळाडू महेला जयवर्धने यांनी हे आरोप फेटाळले होते. पण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन श्रीलंकन क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत तत्कालीन निवड समिती प्रमुख अरविंद डी-सिल्वा, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, उपुल थरंगा, महिंदानंद अलुथगमगे यांनी आपली बाजू मांडली.

मात्र कोणत्याही पद्धतीने ठोस पुरावे न मिळाल्याने श्रीलंकन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला आहे. सामना फिक्स असल्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी केली. कोणतेही ठोस पुरावे गेल्या काही दिवसांत समोर आले नाही. श्रीलंकन पोलिसांनीही आपला तपास थांबवला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने चौकशी करावी असा एकही पुरावा समोर आलेला नसल्यामुळे या सामन्यावर शंका घेण्याचं कारण नसल्याचं मार्शल यांनी सांगितलं.