कबड्डीच्या विश्वचषकाचा थरार भारतात रंगणार असून, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. येत्या ऑक्टोबर महिन्यात १२ देशांचा समावेश असलेल्या कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेचे सामने हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात क्रीडा मंत्री विजय गोयल आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या बोधचिन्हासह स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. भारतासह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, केनिया, पाकिस्तान, बांगलादेश, इराण, द.कोरिया, थायलंड, अर्जेंटिना या संघाचा समावेश आहे. स्पर्धेची सुरूवात ७ ऑक्टोबर रोजी यजमान भारतीय संघाच्या सामन्याने होणार आहे. भारतासमोर पहिलेच बलाढ्य द.कोरियाचे आव्हान असणार आहे. ७ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा रंगेल. २१ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरी, तर शनिवारी २२ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होईल. अर्थात यजमान भारतीय संघ या स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार असणार आहे.

प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डीला खेळाला लोकप्रियता मिळाली. आता विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून कबड्डी खेळाला जागतिक ओळख मिळवून देण्याचे लक्ष्य आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे असल्याचे जनार्दनसिंग गेहलोत म्हणाले. स्पर्धेत दोन गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटात सहा संघांचा समावेश आहे. पहिल्या गटात भारतीय संघाचा समावेश आहे. स्पर्धेची तिकीट विक्रीला आजपासून सुरूवात झाल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली. कबड्डी चाहत्यांना ‘बूक माय शो’ यावरूनही स्पर्धेची तिकीट आरक्षित करण्याची सुविध असणार आहे.