ऑस्ट्रेलियाच्या रुपाने रविवारी जगाला टी-२० क्रिकेटमधील नवा विश्वविजेता मिळाला. मात्र क्रिकेट चाहत्यांना ही स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने आणखीन एक गूड न्यूज दिलीय. आयसीसीने पुढील वर्षी म्हणजे २०२२ रोजी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तारखा आणि मैदानांची घोषणा केलीय. पुढील वर्षीचा विश्वचषक हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाणार असून १६ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेलबर्नच्या मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केलंय.

नक्की वाचा >> विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

न्यूझीलंडला पराभूत करुन जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या घरच्या मैदानांवरच आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धी पाहुण्या संघांना टक्कर देईल. दुबईमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. आता पुढचा विश्वचषक हा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी क्रिकेट ग्राऊण्ड अॅडलेड ओव्हलवर ९ आणि १० नोव्हेंबर रोजी उपांत्यफेरीचे सामने खेळवले जाणार आहेत.

नक्की वाचा >> UAE वरुन परतणाऱ्या हार्दिक पांड्याला कस्टमचा दणका; मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आली पाच कोटींची घड्याळं

ब्रिसबेन, गीलाँग, होबार्ट, पर्थ या चार मैदानांवर साखळी फेरीतील सामने खेळवले जातील. काही ठिकाणी अद्याप करोनाचे निर्बंध लागू असून भविष्यामध्ये काही ठिकाणी ते असेच लागू असतील असा विचार करुन कमी प्रवास करावा लागेल अशा पद्धतीने सामन्यांचे नियोजन करण्याला प्राधान्य आहे. मेलबर्नच्या मैदानामध्ये २०२० महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. यावेळी ८६ हजार १७४ क्रिकेट चाहत्यांनी प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत केलं होतं.

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२० च्या यशानंतर आणि दोन वर्ष सामने पुढे ढकलल्यानंतर आता आम्ही २०२२ च्या स्पर्धेसाठी सज्ज आहोत, असं आयसीसीचे इव्हेंट्स हेड ख्रिस टेटली यांनी म्हटलं आहे. १२ संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत.

नक्की वाचा >> T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सुपर १२ साठी पात्र ठरले आहेत. तर नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या संघांना पात्रता फेरीतील सामने खेळावे लागणार आहेत. या संघाबरोबर इतर चार संघही पात्रता फेरीमध्ये खेळतील.