पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा असलेल्या नेमबाजी क्रीडा प्रकारात पहिल्या दिवसाची सुरुवात निराशाजनक झाली असली, तरी दिवसाच्या अखेरीस १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने अंतिम फेरी गाठताना भारतीयांचा उत्साह कायम राखला. २२ वर्षीय मनूने अचूक वेध साधताना ५८० गुणांसह पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. याच नेमबाजी प्रकारात रिदम सांगवान मात्र ५७३ गुणांसह १५व्या स्थानावर राहिली. मनूला रविवारी पदकाची संधी मिळेल. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत मनूची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मात्र, पॅरिसमध्ये तिच्या कामगिरीतील आणि मानसिकतेतील सुधारणा स्पष्टपणे दिसून आली. रायफल प्रकाराच्या मिश्र दुहेरी आणि पिस्तूल प्रकारात पुरुष नेमबाजांना अपयश आल्यानंतर मनूच्या कामगिरीने भारताच्या पदकाच्या आशा कायम राहिल्या. पुरुषांना अपयश पुरुषांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाजांनी पार निराशा केली. सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. सरबज्योत पात्रता फेरीत ५७७ गुणांसह नवव्या, तर अर्जुन ५७४ गुणांसह १८व्या स्थानावर राहिला. हेही वाचा >>> IND vs SL: ऋषभ पंतचा अनोखा शॉट, चेंडू गेला सीमारेषेपार तर बॅटलाही उडवलं हवेत… VIDEO होतोय व्हायरल सरबज्योत आणि जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरचे समान ५७७ गुण होते. मात्र, वॉल्टरने सरबज्योतपेक्षा अधिक वेळा १० गुणांचा वेध घेतला. त्यामुळे अखेरच्या आठव्या क्रमांकाने वॉल्टर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. सरबज्योतने १६, तर वॉल्टरने १७ वेळा दहा गुणांचा वेध घेतला. सरबज्योतची सुरुवात निराशाजनक होती. त्यानंतर सरबज्योतने कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो लय टिकवून ठेवू शकला नाही. मिश्र दुहेरीत निराशा त्याआधी १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत अर्जुन बबुता-रमिता जिंदाल आणि संदीप सिंग-इलावेनिल वलारिवन या भारतीय जोड्या पदकाच्या शर्यतीतही येऊ शकल्या नाहीत. पात्रता फेरीत चीनची जोडी ६३२.२ गुणांसह प्रथम क्रमांकावर राहिली. पात्रता फेरीतील पहिल्या चार क्रमांकाचे नेमबाजच पदकाच्या शर्यतीत राहतात. यातील पहिल्या दोन क्रमांकामध्ये सुवर्णपदकाची, तर तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावरील जोड्यांत कांस्यपदकाची लढत होते. रमिता-बबुता जोडी ६२८.७ गुणांसह सहाव्या, तर संदीप-इलावेनिल जोडी ६२६ गुणांसह १२व्या स्थानावर राहिली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक चीनच्या नावावर राहिले. १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत चीनच्या हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी कोरियाच्या केऊन जियेऑन आणि पार्क हाजून जोडीचा १६-१२ असा पराभव करून सोनेरी कामगिरी केली. सुवर्णयश मिळवणारी ही सर्वांत युवा जोडी ठरली. हुआंग १७, तर शेंग १८ वर्षांचा आहे.