सिडनी : लॉस एंजलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, या हेतूने २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला देण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विचार करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना संयुक्तपणे २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद देण्यात येईल, असे समजते. त्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होण्याची शक्यता असून ५५ सामने खेळवण्यात येऊ शकतात. यंदाच्या तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात प्रत्येकी १६ संघ सहभागी असून ४५ लढती खेळवण्यात येणार आहेत.

 ‘‘२०२४ ते २०३१ या कालखंडात होणाऱ्या ‘आयसीसी’ स्पर्धाचे यजमानपद अद्याप ठरवण्यात आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, यासाठी ‘आयसीसी’ फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे. त्याशिवाय क्रिकेटमधील उदयोन्मुख संघांनाही जागतिक पातळीवरील स्पर्धाच्या आयोजनाची संधी मिळावी, असा ‘आयसीसी’चा मानस आहे. त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाचा विचार करता २०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत खेळवणे खेळाच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकते. लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वीच्या सात ट्वेन्टी-२० विश्वचषकांचे अनुक्रमे दक्षिण आफ्रिका (२००७), इंग्लंड (२००९), वेस्ट इंडिज ( २०१०), श्रीलंका (२०१२), बांगलादेश (२०१४), भारत (२०१६) आणि संयुक्त अरब अमिराती (२०२१) येथे आयोजन करण्यात आले आहे.