Virat Kohli On Retirement Plan: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. ज्या ज्या वेळी भारतीय संघ अडचणीत असतो, त्यावेळी विराटने फलंदाजीला येऊन भारतीय संघाचा डाव सावरला आहे. येत्या काही महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची संघबांधणी सुरू झाली आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा या संघाचा भाग असणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान विराटने आपल्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
जियोस्टारच्या एका मुलाखतीदरम्यान विराट म्हणाला, “हा भारतीय संघासाठी माझा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. हीच माझी प्रेरणा असेल. या वर्ल्डकप स्पर्धेत मला माझं सर्वस्व पणाला लावायचं आहे. देशासाठी वर्ल्डकप जिंकणं हेच माझं लक्ष्य आहे. त्यासाठी जे काही करायचं असेल, ते करायला मी तयार आहे.” विराट कोहली २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाचा भाग होता. या स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर २०१९ आणि २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा विजय थोडक्यात हुकला होता.
तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्यात काय बदललं आहे? सर्वात आधी मी मनापासून एक गोष्ट ठरवली आहे, ती म्हणजे अधिक मोकळेपणाने खेळणार. लोकं माझ्याकडून काय अपेक्षा ठेवतात, याचा विचार न करत मी फक्त खेळणार. मी गोष्टींचा समतोल साधत खेळणार. मला चांगल्याने माहीत आहे, माझ्यासोबत असलेले इतर खेळाडूही उत्तम आहेत. परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना चांगल्याने माहीत आहे. मला स्वतःला व्यक्त करण्याची गरज आहे आणि सातत्याने असंच करत राहावं लागेल.”
विराट २०२५ मध्ये आयसीसी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. २०२५ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेत त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी केली होती. गेल्या १० वनडे सामन्यांमध्येही त्याने दमदार फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने ६४.६८ च्या सरासरीने १०३५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३ शतकं आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर होणार आहे. त्यामुळे विराट कोहलीसारखा अनुभवी फलंदाज संघात असणं खूप गरजेचं आहे. दरम्यान विराटला संघात स्थान मिळणार का? की टीम मॅनेजमेंट नवख्या खेळाडूंना संधी देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
