आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून मुंबई आणि बंगळुरू यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुकाबल्याची जोरदार चर्चा होती. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, विराट कोहली अशा भारताच्या एकापेक्षा एक सरस खेळाडूंना याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार होती. प्रक्षेपणकर्त्या कंपनीने या आठवड्याचं वर्णन Rivalry week असं केलं होतं. मात्र रविवारी उकाड्याने काहिली झालेल्या संध्याकाळी एक रटाळ आणि अगम्य मैफल रंगली. दोन्ही संघांनी मिळून दोनशेपार धावा करत षटकारांची लयलूट केली मात्र हे करताना किती वेळ निघून गेला याची मोजदादच राहिली नाही.

साडेसातला सुरु झालेला हा सामना ११.५०ला संपला. टी२० सामना तीन सव्वा तीन तासात संपणं अपेक्षित आहे मात्र ही बहुचर्चित लढत जवळपास साडेचार तास चालली. वाईड, नोबॉलचे खिरापत, त्यात रिव्ह्यूची पडलेली भर, दुखापतींमुळे घ्यावे लागलेला टाईमआऊट यामुळे या मैफलीतला सूरच हरवून गेला.

दोन्ही संघांनी मिळून ११ रिव्ह्यू घेतले. यापैकी केवळ दोन रिव्ह्यू यशस्वी ठरले. बाकी रिव्ह्यू घेताना उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. रिप्ले पाहून ते निर्णय देतात. मात्र यात बराच वेळ जातो. बहुतांश रिव्ह्यू हे झेल स्पष्ट टिपला आहे की नाही यासाठी नव्हते. वाईड आणि नोबॉल देण्यासंदर्भात रिव्ह्यू घेण्यात आले.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. वानखेडेच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बंगळुरूच्या फलंदाजांनी धावांची टांकसाळच उघडली. बंगळुरूने २४० धावांचा डोंगर उभारला. या धावमैफलीत मुंबईच्या गोलंदाजांची दमछाक उडाली. हार्दिकने ६ गोलंदाजांचा उपयोग केला. सहाजणांनी मिळून १२ अवांतर धावा दिल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने २२२ धावांची मजल मारली. बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारनेही सहा गोलंदाजांचा उपयोग केला. त्यांनी १० अवांतर धावा दिल्या. दोन्ही संघांनी मिळून २२ धावा एक्स्ट्राच्याच दिल्या.

सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा दुखापग्रस्त झाले. विराटने ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. पायाच्या दुखापतीमुळे विराट क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. २० षटकं क्षेत्ररक्षण केल्यानंतर रोहित सलामीला आला. मात्र थोड्याच वेळात त्याला त्रास जाणवू लागला. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे मैदानात उपचार करण्यात आले. त्यानंतर एकच चेंडू खेळल्यानंतर खेळता येणार नसल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो ड्रेसिंगरुममध्ये परतला. त्याने १९ धावा केल्या.

बंगळुरूचा डाव सुरू असताना हार्दिक पंड्याने टाकलेलं १८वं षटक अनाकलनीय होतं. पहिल्या चेंडूवर टीम डेव्हिडने चौकार लगावला. चेंडू टाकल्यानंतर हार्दिकने तात्काळ ड्रेसिंगरुमच्या दिशेने खूण केली. क्रॅम्पचा त्रास असेल असं जाणवलं. उपचारानंतर हार्दिक पुन्हा गोलंदाजासाठी सज्ज झाला. दुसरा चेंडू उंचीच्या कारणास्तव नोबॉल देण्यात आला. फ्री हिट मिळाल्यामुळे डेव्हिडने फायदा उठवत षटकार चोपला. चेंडू स्टँड्समध्ये आदळल्याने त्याचा आकार बदलला. मैदानावरील पंचांनी नव्या चेंडूची मागणी केली. चौथ्या पंचांनी चेंडूंचा संच आणला. मैदानावरील पंचांनी नवा चेंडू निवडला. मात्र टीम डेव्हिडला त्याचा आकार योग्य वाटला नाही. त्याने चेंडू हाताने उडवत पंचांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. पंच चेंडू मागत राहिले, डेव्हिड चेंडू उसळवत दाखवत राहिला. पंच वीरेंद्र शर्मा यांनी समज दिल्यानंतर डेव्हिड थांबला. पुढच्या चेंडूवर डेव्हिडने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर जितेश शर्माने दोन धावा घेतल्या. पाचवा चेंडू निर्धाव पडला. सहाव्या चेंडूवर जितेशने दोन धावा घेतल्या. प्रदीर्घ कालावधीनंतर हे षटक अखेर संपलं.

योगायोगाने बंगळुरूच्या रसिक सलामने टाकलेलं १६वं षटकही दुखापतीमुळे प्रदीर्घ ठरलं. षटक सुरू करतानाच रसिकला त्रास जाणवला. त्यामुळे फिजिओंनी मैदानात धाव घेत उपचार केले. रसिक फिट झाला. शेरफन रुदरफोर्डने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. रसिकला पुन्हा त्रास जाणवू लागला. पण त्याने दुसरा चेंडू टाकला. या चेंडूवर रुदरफोर्डने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर नमन धीर बाद झाला. रसिकने उत्साहात विकेटचा आनंद साजरा केला. चौथा आणि पाचवा चेंडू त्याने व्यवस्थित टाकला. मात्र यानंतर त्याचं दुखणं बळावलं. फिजिओंनी पुन्हा मैदान गाठलं. मात्र दुखापत गंभीर असल्यामुळे रसिकला षटक पूर्ण करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं. तो ड्रेसिंगरुमध्ये परतला. रोमारिओ शेफर्डने शेवटचा चेंडू टाकला. रुदरफोर्डने मारलेला फटका हवेत उंच उडाला. शेफर्डने स्वत: धावत जाऊन झेल टिपला. मात्र पंचांनी चेंडू नोबॉल असल्याचं घोषित केलं. वैध अशा सहाव्या चेंडूवर रुदरफोर्डने एक धाव घेतली. अखेर हे षटक संपलं.

रविवारी संध्याकाळी चाहत्यांना षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. बंगळुरूच्या फलंदाजांनी १५ षटकार चोपले तर मुंबईच्या फलंदाजांनी १४ षटकारांची लयलूट केली. यापैकी ९ शेरफन रुदरफोर्डने एकट्याने मारले. रविवारी मुंबईतलं तापमान चाळिशीपर्यंत पोहोचलं होतं. प्रचंड उकाडा आणि आर्द्रता याचा प्रचंड त्रास खेळाडूंना जाणवला. सातत्याने एनर्डी ड्रिंक्स, केळी तसंच घाम पुसायला टॉवेल्स हे सगळं राखीव खेळाडू सातत्याने पुरवत होतं. मात्र वातावरण घामटा काढणारं होतं.

वानखेडे स्टेडियम हा मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र आता हा बालेकिल्ला राखणं मुंबईला जड जात आहे. रोहितला कर्णधारपदावरून बाजूला करून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याच्या निर्णयाची पुन्हा एका सोशल मीडियावर चर्चा रंगली. भारताचा वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा सोपवायला हवी असाही काही चाहत्यांचा सूर होता. छोट्या मैदानावर षटकार कसे रोखायचं याचं कोडं मुंबईला सुटत नसल्याचं चित्र आहे. मुंबईचं प्रमुख अस्त्र असलेला जसप्रीत बुमराहला विकेटच मिळालेली नाही. दीपक चहरच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्ध्यांनी धावा कुटल्या आहेत. ट्रेंट बोल्ट चेंडू स्विंग करणं विसरला आहे. शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी प्रसिद्ध मिचेल सँटनरलाही तडाखा बसला आहे. फलंदाजीत तिलक वर्माला सूर गवसलेला नाही. चाळिशीकडे झुकलेल्या रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. अनुभवी क्विंटन डी कॉकला बाजूला सारून रायल रिकलटनला संधी देण्यात आली आहे. मात्र त्याच्या खेळात सातत्य नाहीये.