२३ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी सेरेना विल्यम्स लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. सेरेनानं मंगळवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी शेवटी होणाऱ्या यूएस ओपननंतर टेनिस स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचं तिने सांगितलं आहे. सेरेनाने १९९९ मध्ये पहिल्यांदा यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

खरं तर, मागील काही काळापासून सेरेना विल्यम्स आपल्या जुन्या शैलीत टेनिस खेळताना दिसली नाही. शिवाय ती सातत्यपूर्ण टेनिस स्पर्धेत भागही घेताना दिसली नाही. निवृत्तीबाबतची घोषणा करताना तिने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर लिहिलं की, “मला निवृत्ती हा शब्द अजिबात आवडत नाही. मी याला जीवनातील विकासाचा एक टप्पा म्हणेन. त्यामुळे मी माझ्या जीवनातील पुढच्या टप्प्याबाबत विचार करत आहे. आयुष्यात एक वेळ अशी येते, जिथे आपल्याला वेगळ्या दिशेनं पुढे जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो.”

“जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, तेव्हा त्या गोष्टीपासून दूर जाणं खूप कठीण असतं. पण आता उलटी गिनती सुरू झाली आहे. मला आई होण्याचं सुख आणि माझं आध्यात्मिक ध्येय गाठायचं आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे मी टेनिस खेळाचा प्रचंड आनंद लुटणार आहे” असं सेरेनानं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा- CWG 2022: “आम्ही रौप्यपदक जिंकले नाही तर, सुवर्णपदक गमावले,” हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली खंत

यावर्षी सेरेना विल्यम्सनं ‘विम्बल्डन ओपन’ स्पर्धेत भाग घेतला होता. पण पहिल्याच फेरीत तिला बाहेर पडावं लागलं. फ्रान्सच्या हार्मोनी टॅनने तिचा पराभव केला. सेरेना सध्या कॅनेडियन ओपन स्पर्धेत खेळत आहे. तिने या स्पर्धेत दुसरी फेरी गाठली आहे. सेरेनाने सोमवारी पहिल्या फेरीत स्पेनच्या नुरिया डियाजचा ६-३, ६-४ ने पराभव केला आहे.