ईडन गार्डन्सवरील रौप्यमहोत्सवी सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट क्लब ऑफ बंगालतर्फे (कॅब) आयोजित करण्यात आलेल्या खास सत्कार कार्यक्रमाला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हजर राहू शकणार नाहीत. ईडन गार्डन्सवर आपला ठसा उमटवणाऱ्या दोन्ही देशांतील काही दिग्गज क्रिकेटपटूंचा गुरुवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या मध्यंतरप्रसंगी सत्कार करण्याचे ‘कॅब’ने निश्चित केले आहे.
१८ फेब्रुवारी १९८७ या दिवशी इडन गार्डन्सवर भारत-पाकिस्तान या दोन संघांमध्येच पहिला एकदिवसीय सामना झाला होता. आता गुरुवारी भारत-पाकिस्तान यांच्यातच रौप्यमहोत्सवी एकदिवसीय सामना ईडनवर होत आहे. त्यानिमित्त ‘कॅब’तर्फे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते २५ दिग्गज क्रिकेटपटूंना चांदीचे सन्मानचिन्ह, टाय, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मैदानावर गौरविण्यात येणार आहे. यावेळी ही मंडळी वाहनातून मैदानाला एक फेरी मारतील आणि क्रिकेटरसिकांना अभिवादन करतील.
‘‘मसुरीला कुटुंबासोबत सुटी घालवीत असलेला सचिन या सत्कार सोहळ्याला हजर राहू शकणार नाही,’’ अशी माहिती ‘कॅब’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी दिली. तथापि, अजित वाडेकर, बिशनसिंग बेदी, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, कपिलदेव, के. श्रीकांत, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी या भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे मुश्ताक मोहम्मद, सादिक मोहम्मद, इन्तिखाब आलम, इम्तियाझ अहमद, वासिम अक्रम, रमिझ राजा, इन्झमाम उल हक आणि शोएब या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचाही गौरव करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
रौप्यमहोत्सवी एकदिवसीय सामन्यानिमित्त ‘कॅब’तर्फे २५ दिग्गज क्रिकेटपटूंचा सत्कार
ईडन गार्डन्सवरील रौप्यमहोत्सवी सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट क्लब ऑफ बंगालतर्फे (कॅब) आयोजित करण्यात आलेल्या खास सत्कार कार्यक्रमाला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हजर राहू शकणार नाहीत.
First published on: 03-01-2013 at 04:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 crickets gets honored by cab