नवी दिल्ली : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २५ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील सहावा फलंदाज ठरला. मात्र, त्याने हा टप्पा सर्वात कमी सामन्यांत गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ८ धावा केल्यानंतर कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीचा हा ४९२वा आंतरराष्ट्रीय सामना होता. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी या सामन्यात कोहलीला ५२ धावांची आवश्यकता होती. त्याने पहिल्या डावात ४४ धावा, तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या. आता कोहलीच्या नावावर २५,०१२ धावा आहेत.
२००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने कारकीर्दीत २५ हजार धावा ५४९व्या डावात पूर्ण केल्या. त्यामुळे सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५७७व्या डावात अशी कामगिरी केली होती.कोहलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यांत ८१९५ धावा, २७१ एकदिवसीय सामन्यांत १२,८०९ धावा, ११५ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४००८ धावा केल्या आहेत.