या खेळपट्टीवर सरासरी किती धावा हव्या होत्या? या प्रश्नावर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने दिलेल्या उत्तराने क्रिकेटचाहत्यांना धक्का बसला आहे. भारतीय संघाने रायपूर इथे झालेला दुसरा टी२० सामना ७ विकेट्स आणि २८ चेंडू राखून जिंकला. सामना संपल्यानंतर समालोचक हर्षा भोगलेंनी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरला एक प्रश्न विचारला. सँटनरच्या उत्तराने टी२० प्रकारातली अपरिहार्यताही स्पष्ट झाली आहे.

या खेळपट्टीवर सरासरी किती धावा हव्या असा प्रश्न भोगले यांनी विचारला. यावर सँटनर म्हणाला, ‘कदाचित ३०० धावाही कमी पडतील’. पराभवाने नाराज सँटनरने मनातील खंत व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, ‘भारताचा संघ टी२० प्रकारात अव्वल आहे. दमदार फटकेबाजी करणारे असंख्य खेळाडू त्यांच्याकडे आहेत. ६/२ अशी अवस्था असतानाही त्यांनी जोरदार आक्रमण केलं. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी सामना आमच्या हातून काढून नेला’.

‘वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संघातील सगळ्यांना संधी मिळावी असा प्रयत्न आहे. या सामन्यात आमच्या हातून काही चुका झाल्या. त्या आगामी सामन्यात होणार नाहीत याची काळजी घेऊ’.

‘ही खेळपट्टी चांगली होती. आम्ही चांगली सुरुवात केली. मात्र अडीचशेपर्यंत पोहोचू शकलो नाही. चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेपलीकडे जात होता. कदाचित ३०० धावाही कमी पडल्या असत्या. दवामुळेही फरक पडतो. चेंडू नीट पकडता येत नाही. ओला चेंडू हाताळणं अवघड आहे. आम्ही पुनरागमन करू’, असं सँटनरने सांगितलं.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावांची मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची अवस्था ६/२ अशी झाली होती. भरवशाचा अभिषेक शर्मा भोपळाही फोडू शकला नाही. मात्र इशान किशन (३२ चेंडूत ७६) आणि सूर्यकुमार यादव (३७ चेंडूत ८२) या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना निरुत्तर केलं. या दोघांच्या भागीदारीने सामन्याचं चित्रच पालटलं.

मॉट हेन्री चांगली गोलंदाजी करत असताना न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने युवा झॅक फोक्सला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार-इशान जोडीने झॅकच्या षटकात २४ धावा कुटल्या. या षटकाने दोघांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला. न्यूझीलंडला ही चूक चांगलीच महागात पडली.

तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने सलग दोन टी२० सामने गमावले आहेत. २५ तारखेला तिसरा सामना गुवाहाटी इथे होणार आहे.