झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलरने अफगाणिस्तानविरुद्ध शारजा इथे सुरू झालेल्या कसोटीत ४०व्या वर्षी खणखणीत शतक साजरं केलं. २००० नंतर कसोटीत शतक झळकावणारा दुसरा सगळ्यात वयस्क फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानच्या ४२वर्षीय मिसबाह उल हकने २०१६ मध्ये शतकी खेळी केली होती.
तब्बल आठ वर्षांनंतर ब्रेंडनने कसोटीत शतक झळकावलं आहे. त्याने शेवटचं शतक २०१८ मध्ये झळकावलं होतं.
झिम्बाब्वेचा नवनियुक्त कर्णधार ब्रायन बेनेटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इनोसंट किआने ३४ तर बेन करनने ४२ धावांची खेळी केली. अनुभवी ब्रेंडन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने अफगाणिस्ताच्या गोलंदाजांचा समाचार घेत एकेरी, दुहेरी धावा आणि चौकार, षटकार यांची सुरेख सांगड घातली. ब्रेंडनने बेनसह दुसऱ्या विकेटसह ६५ तर कर्णधार बेनेटसह तिसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. सलीमच्या गोलंदाजीवर चौकार लगावत ब्रेंडनने कारकिर्दीत सातवं शतक साजरं केलं. शतकानंतरही टेलरने तोच फॉर्म कायम राखला. अखेर हशमतुल्ला शाहिदीने त्याला बाद केलं. त्याने १४ चौकार आणि ४ षटकारांसह १३१ धावांची खेळी केली.
नियमित कर्णधार रिचर्ड नकाराग्वा दुखापतग्रस्त झाल्याने झिम्बाब्वेच्या निवडसमितीने २२वर्षीय ब्रायन बेनेटकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. युवा कर्णधाराच्या संघात तीन ४० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे खेळाडू आहेत. टेलरच्या बरोबरीने ग्रीम क्रीमर आणि क्रेग अर्व्हाइन यांचा त्यात समावेश आहे. तांत्रिक नियमांची पूर्तता केल्याने झिम्बाब्वेने अँतूम नक्वीला पदार्पणाची संधी दिली. जन्म बेल्जियममध्ये, मूळ पाकिस्तानी वंशाचा आणि ऑस्ट्रेलियात राहिलेल्या नक्वीने झिम्बाब्वेतील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.
