India vs Ireland 1st T20I Turning Points: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. बेलफास्टच्या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आयर्लंडने २ वेळच्या वर्ल्डचॅम्पियन भारतीय संघावर ३४ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. आयर्लंडने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ९ गडी बाद १८२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव अवघ्या १४८ धावांवर आटोपला. यासह आयर्लंडने कुठल्याही फॉरमॅटमध्ये भारताविरूद्ध पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान काय आहेत भारताच्या पराभवाची काऱणं? जाणून घ्या.
१)टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
आयर्लंडने भारतासमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान तसे मोठेच होते. पण भारतीय संघाची बॅटिंग लाइनअप पाहता, इतकेही कठीण नव्हते. भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. एका बाजूने अभिषेक शर्माने किल्ला लढवत अर्धशतकी खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. संजू सॅमसन अवघ्या ५, इशान किशन १ आणि कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या ३ धावा करुन माघारी परतला. टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे संघ सुरुवातीलाच बॅकफूटवर गेला.
२)आयर्लंडच्या नवख्या गोलंदाजांची दमदार गोलंदाजी
या सामन्यात आयर्लंडकडून जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दोघांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात दमदार गोलंदाजी केली. जय मुंद्राने पहिल्याच चेंडूवर दमदार फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला बाद केलं. यादरम्यान त्याने ४ षटकात अवघ्या २६ धावा खर्च करुन २ गडी बाद केले. तर मॅथ्यू होलार्डने इशान आणि श्रेयससारख्या फलंदाजांना बाद करुन भारताला ३ मोठे धक्के दिले.
३) मधली फळी कोसळली
टॉप ऑर्डरचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवर डाव सावरण्याची जबाबदारी होती. पण तिलक वर्मा अवघ्या १९ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला. भारताला अनुभवी खेळाडूची कमतरता जाणवली, जो शेवटी फटकेबाजी करुन सामना फिनिश करु शकतो.
४) आयर्लंडच्या कर्णधाराची अर्धशतकी खेळी
पहिल्यांदाच आयर्लंडचं नेतृत्व करत असलेल्या लॉर्कन टकरने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान त्याने ३६ चेंडूंचा सामना करत महत्वपूर्ण ५० धावांची खेळी केली.
५) डेथ ओव्हर्स
डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. आयर्लंडचे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले होते. पण शेवटच्या षटकांमध्ये गॅरेथ डेलानीने ४९ आणि जॉर्ज डॉकरेलने १९ धावांची खेळी करुन शेवटच्या ३ षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. याच धावा भारताला शेवटी महागात पडल्या.
सामन्यातील टर्निंग पॉईंट
आयर्लंडने १५ षटकापर्यंत गडी बाद ११८ धावा केल्या होत्या. त्यानंतर १६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने १९ धावा खर्च केल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या १३७ धावांवर जाऊन पोहोचली. पुढच्या षटकात प्रसिधने २७ धावा खर्च केल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या १६४ धावांवर जाऊन पोहोचली. ही २ षटकं भारतीय संघाला चांगलीच महागात पडली.
