लिव्हरपूल : यंदाच्या हंगामात इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलचे २०व्यांदा विजेतेपद पटकाविण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लिव्हरपूल संघाच्या विजययात्रेवर एका व्यक्तीच्या आततायीपणामुळे दु:खाची झालर पसरली.

लिव्हरपूलची विजययात्रा शहराच्या रस्त्यावरून जात असताना चाहत्यांनी दुतर्फा उत्स्फूर्त गर्दी केली होती. विजययात्रा अखेरच्या टप्प्यात असताना एका ५३ वर्षीय व्यक्तीने आपली गाडी गर्दीत घुसवली आणि विजयाच्या उत्साहावर पाणी फेरले. ‘मर्झिसाइड’ पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असले असून, घटनेत ४७ जण जखमी झाले.

यापैकी २० जणांवर घटनास्थळी, तर २७ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमागील कारणांची उलटसुलट चर्चा होण्यापूर्वीच पोलिसांनी याचा दहशतवादाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. यात अन्य कुणी सहभागी असतील असे वाटत नाही. आम्ही अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. अरुंद रस्त्याने ही विजययात्रा अखेरच्या टप्प्यात मार्गस्थ होत असताना छोटी गाडी कशी घुसवण्यात आली याची पोलीस चौकशी करत आहेत. घटनेनंतर विजययात्रा लगेच थांबविण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराच्या मध्यभागी असलेल्या मर्झी नदीजवळील या जागेला पोलिसांनी वेढा दिला. रस्त्यावर बाटल्या, कॅन आणि लिव्हरपूलच्या झेंड्यांचा खच पडलेला दिसून येत होता. चालकाने गाडी गर्दीत घुसवल्यानंतरची दृश्ये भयानक होती असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. एका क्षणी तर लहानमुलासह चार व्यक्ती त्या व्हॅनखाली अडकल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना गाडी उचलावी लागली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.