प्रशिक्षक म्हणून आपल्या पहिल्याच दौऱ्यात टीम इंडियाला विदेशात कसोटी मालिका विजय मिळवून देणाऱ्या अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक ६.५ कोटी रूपयांचे पॅकेज दिले आहे. सोमवारी बीसीसीआयच्या आर्थिक समितीच्या बैठकीत कुंबळेचे वेतन निश्चित करण्यात आले. कुंबळेला मिळणारी रक्कम ही संचालक म्हणून रवी शास्त्रीला दिलेल्या वेतनापेक्षा ७५ लाख रूपयांनी कमी आहे. परंतु, त्याला माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि डंकन प्लेचर यांच्यापेक्षा जास्त वेतन देण्यात आले आहे. कर्स्टन आणि प्लेचर यांना दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी वेतन मिळत असत.
कुंबळेचा बीसीसीआयशी एक वर्षाचा करार आहे. शास्त्री यांची जेव्हा निवड झाली तेव्हा ते इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) मध्ये समालोचकाची भूमिका निभावत होते. त्यामुळे त्यांना जास्तीचे पैसे देण्यात आल्याचे वृत्त मुंबई मिररने बीसीसीआयच्या एका सदस्याच्या हवाल्याने दिले आहे.
अनिल कुंबळे सध्या टीम इंडियाबरोबर वेस्ट इंडिजमध्ये असून टी-२० मालिका खेळण्यासाठी तो अमेरिकेला रवाना झाले आहेत. आपल्या पहिल्याच दौऱ्यात कुंबळेने अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला २५ ऑगस्टपर्यंत लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास सांगितले होते. त्याची अंमलबजावणी २५ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि लोढा समितीमध्ये पुन्हा मतभेद होण्याची शक्यता आहे.