आयर्लंड संघाच्या भारताविरुद्धच्या या मालिकेवर हिंसाचाराच्या घटनांमुळे सावट होतं. त्यातच प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने आयर्लंडचा संघ एकदमच कमकुवत झाला. मात्र नव्या दमाच्या खेळाडूंनी बलाढ्य भारतीय संघाला चीतपट करण्याची किमया केली.

अनुभवी पॉल स्टर्लिंगने टी२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडलं. त्यामुळे क्रिकेट आयर्लंडने लोकरन टकरकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे पॉल खेळण्यासाठी उपलब्ध नव्हता. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटील या मालिकेत खेळू शकणार नाहीये. पोटाला झालेल्या दुखापतीमुळे मार्क अडेअर मालिकेबाहेर गेला. हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे कुर्तीस कॅम्पफर मालिकेचा भाग नाहीये. बॅरी मॅकार्थी लिगामेंट इंज्युरीमुळे कर्तव्यावर नाही तर खांदा आणि पायाच्या दुखापतीमुळे जॉर्डन नीलही उपलब्ध होऊ शकला नाही.

भारतात जन्मलेल्या जय मुंद्राने भारताविरुद्ध आज पदार्पण केलं. राजस्थानमध्ये जन्म झालेल्या जयने पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट पटकावत टीम इंडियाला धक्का दिला. ४ षटकात त्याने अवघ्या २५ धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स पटकावल्या. जयच्या बरोबरीने मॅट हॉलार्डला पदार्पणाची संधी देण्यात आली. त्याने ३ विकेट्स पटकावत टीम इंडियाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. या दोन पदार्पणवीरांनीच भारतीय फलंदाजांना स्थिरावू दिलं नाही. रुब्येन विल्सन हाही पदार्पणाच्या शर्यतीत होता. गॅव्हिन होय या लेगस्पिनरला पदार्पण मिळण्याची शक्यता होती. अनुभवी क्रेग यंगच्या अनुपस्थितीत स्टीफन डोहनी या नव्या खेळाडूची संघात निवड करण्यात आली आहे.

आमच्या प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. ही खूपच वाईट गोष्ट आहे. त्यांचा अनुभव मोलाचा ठरला असता. पण एखाद्या वाईटातून चांगलंही घडू शकतं. नव्या खेळाडूंना यानिमित्ताने संधी मिळते आहे असं आयर्लंडचे निवडसमिती अध्यक्ष अँड्यू व्हाईट यांनी सांगितलं. १४सदस्यीय संघात ३ खेळाडू पदार्पणासाठी सज्ज आहेत असं ते म्हणाले होते. त्यांचा विश्वास या नव्या शिलेदारांनी सार्थ ठरवला.

आयर्लंडचे खेळाडू नवखे वाटले तरी ते नियमितपणे इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळतात. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या बरोबरीने खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे असतो. दडपणाच्या क्षणी खेळ कसा असावा याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आयर्लंडच्या खेळाडूंना खेळपट्टीचा नूर चांगलाच ठाऊक होता. मैदानाची कुठली बाजू लहान आहे हे त्यांना ठाऊक होती. त्यानुसार कर्णधार लोरकन टकर आणि गॅरेथ डेलानी यांनी फटकेबाजी केली. आयर्लंडच्या गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध मारा करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवलं. आयपीएलमुळे प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार लगावण्याची सवय झालेल्या भारतीय फलंदाजांना अवघड खेळपट्टी मानवली नाही.

कर्णधार लोकरन टकरसाठी कर्णधार म्हणून हा तिसराच सामना आहे. कर्णधारपदाचा त्याच्यासाठी हा पहिलाच मोठा अनुभव आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत नव्या दमाच्या खेळाडूंना बरोबर घेत घरच्या मैदानावर टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाला नमवण्याची ताकद आयर्लंडने दाखवली.

या पराभवामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडने १-० आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकणे भारतासाठी क्रमप्राप्त आहे. अन्यथा मालिकाविजयाची नामुष्की ओढवेल.