दमदार सांघिक प्रदर्शनासह यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने सलग सात लढती जिंकल्या. प्लेऑफ प्रवेशासाठी त्यांना उर्वरित सात लढतीत केवळ दोन विजय मिळवणं आवश्यक होतं. पंजाबसाठी प्लेऑफ प्रवेश औपचारिकता मानला जात होता. ऐन भरात असतानाच पंजाबची गाडी रुळावरून घसरली. एक दोन नव्हे तर सलग सहा लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र सहा पराभवांनी पंजाबची लयच हरपली. लखनौला नमवत पंजाबने प्लेऑफ्सच्या आशा जिवंत राखल्या. मुंबई इंडियन्सने राजस्थानला नमवलं असतं तर पंजाबचा प्लेऑफ प्रवेश पक्का झाला असता पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. रविवारी राजस्थानने दिमाखदार कामगिरीसह मुंबईला हरवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. राजस्थानच्या विजयासह पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं. भरधाव निघालेला विजयरथ गाळात रुतावा अशी पंजाबची गत झाली. सलग १९ हंगाम खेळूनही पंजाबचा संघ जेतेपदाविनाच परतणार आहे. पंजाबचं असं का झालं? तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी होत असताना घरी जाण्याची वेळ का ओढवली याचा घेतलेला आढावा.

सोशल फाजील मीडिया

धरमशाला इथे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत तिलक वर्माला ‘ओये अंधेरे’ म्हटल्याने वाद पेटला. वर्णभेदी टीकेनंतर नेटकऱ्यांनी अर्शदीपवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अर्शदीप सिंग व्लॉगिंग करतो. सोशल मीडियावर तो अतिशय सक्रिय असतो. हलक्याफुलक्या पद्धतीचं कंटेट तो करत असतो. टी२० प्रकारात भरवशाचा गोलंदाज असलेल्या अर्शदीपला यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कामगिरीत घसरण होत असताना दुसरीकडे तिलकला उद्देशून आक्षेपार्ह उद्गारांमुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. बीसीसीआयने हंगामादरम्यान जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार खेळाडूंनी युट्यूब चॅनल, व्लॉग, सोशल मीडिया यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित करावं. एकप्रकारे अर्शदीपला ही चपराक होती. पंजाब किंग्ज संघाच्या सोशल मीडिया हँडल्सने कंटेट करताना थोडं भान राखायला हवं होतं. कोलकाताविरुद्धची लढत रद्द झाल्यानंतर मन मोठं म्हणून गुण दिला अशा आशयाचा व्हीडिओ शेअर केला. त्यांना तो व्हीडिओ डिलिट करावा लागला. ४९ वर ऑलआऊट होण्यावरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला डिवचलं. संघ जिंकत असताना विनाकारण फाजील पद्धतीचं कंटेट तयार करून त्यांनी प्रतिमा खराब केली.

झेलसोडे

कॅचेस विन मॅचेस अशी क्रिकेटमधली जुनी म्हण आहे. पंजाबला या उक्तीचा चांगलाच प्रत्यय घडला. झेल सोडण्याबाबत पंजाब किंग्ज संघाने कहर केला. उडालेल्या ५६ झेलांपैकी १६ झेल त्यांना टिपता आले नाहीत. फलंदाजांचं वर्चस्व राहिलेल्या या स्पर्धेत झेल सुटणं हे जणू पातकच आहे. शशांक सिंह याने सर्वाधिक म्हणजे ५ झेल सोडले. अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने सातत्याने सापळे रचून झेल उडेल अशी परिस्थिती निर्माण केली. मात्र पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी बेसिक गोष्टीतच कच्चं असल्याचं सिद्ध केलं. कर्णधार श्रेयस अय्यरला शशांकला क्षेत्ररक्षणात लपवण्याची वेळ आली. शशांकचा वाण बाकी खेळाडूंनाही लागला. यामुळेच हंगामात पंजाबची कॅचिंग एफिशियन्सी ७१.४३ एवढी राहिली. झेलच्या बरोबरीने पंजाबने स्टंपिंगच्या काही संधीही वाया दवडल्या. हेनरिच क्लासन आणि इशान किशनसारख्या जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या खेळाडूंचे झेल सोडणं पंजाबला चांगलंच महागात पडलं. पंजाबच्या विदेशी खेळाडूंनाही झेल सोडण्याची लागण झाली. पंजाबचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग हे जगातल्या अव्वल क्षेत्ररक्षकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या संघानेच एवढे झेल सोडणं अगम्य योगायोग ठरला.

धावांची लूटमार

युझवेंद्र चहल हा पंजाबचा प्रमुख फिरकीपटू आहे. यंदाच्या हंगामात चहलच्या गोलंदाजीवर झेल सुटले हे खरं पण त्याच्या गोलंदाजीतली धार कमी झाल्याचं स्पष्टपणे जाणवलं. १४ लढतीत चहलने १२ विकेट्स पटकावल्या. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत चहल अव्वल स्थानी आहे. अगदी आतापर्यंत चहलच्या गोलंदाजीवर धावा काढणं फलंदाजांना जड जात असे. मात्र यंदाच्या हंगामात चहलच्या गोलंदाजीवर सहजपणे धावा लुटल्या गेल्या. पंजाबने फिरकीवर लक्ष दिलं नसल्याचंही आकडेवारी सांगते. डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार यंदाच्या हंगामात केवळ दोनच सामने खेळला. दुसऱ्या सामन्यात त्याने विकेट्स पटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. पंजाबच्या फिरकीपटूंनी फक्त ५९ षटकं टाकली. यावरूनच फिरकी हा विषय त्यांनी ऑप्शनला टाकल्यासारखं जाणवलं. फिरकी असं नव्हे एकूणच गोलंदाजांनी पंजाबला गाशा गुंडाळायला लावला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पंजाबच्या गोलंदाजांनी ९वेळा २००पेक्षा जास्त धावा दिल्या. एका हंगामात एवढ्या धावा लूटू देण्याचा हा विक्रम आहे. अर्शदीप सिंग पंजाबच्या माऱ्याचा प्रमुख आहे पण यंदा तो पूर्णपणे भरकटलेला वाटला. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनवर पंजाबने विश्वास ठेवला पण ना त्याला धावा रोखता आल्या ना विकेट्स पटकावता आल्या. झेव्हियर बार्टलेट स्थिरावत असताना पंजाब संघव्यवस्थापनाने बेन ड्वारिशियॉस आणि नंतर लॉकी फर्ग्युसनला अंतिम अकरात घेतलं. दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडलेल्या लॉकीला धावांवर नियंत्रण ठेवता आलं नाही, विकेटही पटकावता आल्या नाहीत. १२पैकी ९ गोलंदाजांनी षटकामागे १० धावा दिल्या. विजयकुमार व्यशकला नियमित न खेळवण्याचा निर्णयही अनाकलनीय होता.

होमग्राऊंड बदललं

आयपीएल स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई या संघांकडे प्रत्येकी ५ जेतेपदं आहेत. कोलकाताकडे ३ जेतेपदं आहेत. यांच्यापैकी कोणत्याही संघाने होमग्राऊंड बदललं नाही. चेन्नईत तांत्रिक कारणांमुळे काही स्टँड्स रिकामे ठेऊनही चेपॉक इथेच सामने झाले. पंजाबचा संघ मात्र होमग्राऊंड सोडतो आणि त्याचा फटका त्यांना बसतो असं निरीक्षण भारताचा माजी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने मांडलं. मोहाली हे पंजाब किंग्जचं होमग्राऊंड आहे. तिथल्या वातावरणाची, खेळपट्टीची कल्पना खेळाडूंना आहे. या मैदानावरच सगळे सामने खेळण्याऐवजी पंजाबने न्यू चंदीगढ अर्थात मुल्लापूर आणि धरमशाला इथे काही सामने खेळण्याचा निर्णय घेतला. धरमशाला हे मैदान हिमालयाच्या पायथ्याशी आहे. तिथे खेळताना वाऱ्याची दिशा समजून घेऊन खेळावं लागतं. हे मैदान प्रचंड उंचीवर आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगळ्या पद्धतीने वागतो. मोहालीत उत्तम कामगिरी होत असताना अन्यत्र सामने भरवण्याचा सोस पंजाब संघाच्या अंगलट आला आहे.

फॉर्ममध्ये घाऊक घसरण

दिल्ली प्रीमिअर लीग स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आयपीएलमध्ये आलेल्या प्रियांश आर्यने हंगामाची सुरुवात झंझावाती केली मात्र सात लढतींनंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी प्रियांशचे कच्चे दुवे हेरले. पॉवरप्लेच्या ६ षटकात तुफान फटकेबाजी करणाऱ्या प्रियांशला झटपट माघारी धाडत प्रतिस्पर्धी संघांनी पंजाबला वेसण घातली. मार्कस स्टॉइनसच्या रुपात पंजाबकडे अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र त्याचा अनुभव ना गोलंदाजीत कामी आला ना फलंदाजीत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचं भविष्य असं कूपर कॉनलीला म्हटलं जातं. कॉनलीने चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. कॉनलीप्रमाणेच नेहल वढेराकडून पंजाबला दमदार खेळाची अपेक्षा होती. मात्र नेहलला यंदा सूर गवसला नाही. वैयक्तिक कारणांमुळे अफगाणिस्तानच्या ओमरझाईला मायदेशी परतावं लागलं. याचा मोठा फटका पंजाबला बसला. परतल्यानंतरही पंजाबने ओमरझाईला खेळवलंच नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर योगदान देणाऱ्या ओमरझाईला राखीव खेळाडूत बसवणं अनाकलनीय होतं.

नजर हटी दुर्घटना घटी

सलग सात विजयांनंतर पंजाबचा संघ बेसावध झाला. उर्वरित ७पैकी २ सामने जिंकले की प्लेऑफमध्ये इतकं साधं समीकरण त्यांना वाटू लागलं. कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करू शकतो किंवा कितीही मोठी धावसंख्या उभारू शकतो हा फाजील आत्मविश्वास पंजाबच्या खेळात दिसू लागला. दुर्देवाने पंजाबची कामगिरी घसरत असतानाच बाकी संघांनी चुकांतून शिकत पुनरागमन केलं. पंजाबच्या कच्च्या दुव्यांवर प्रहार करत प्रतिस्पर्धी संघ जिंकू लागले. रोरावत निघालेला पंजाबचा विजयरथ जो गाळात रुतला तो कायमचाच. श्रेयस अय्यर कर्णधार आणि मुख्य फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत असतानाही बाकी खेळाडूंची त्याला साथ लाभली नाही. श्रेयसचा मिडास टच पंजाबला प्लेऑफ्समध्ये नेणार असं चाहत्यांना वाटत होतं पण राजस्थानने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.