A video claiming to celebrate India's final defeat in Bangladesh has gone viral : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचे करोडो चाहते दु:खी झाले आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बांगलादेशमध्ये भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे, हे सांगणे कठीण आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया ६ गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. वास्तविक विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला होता. यामध्ये भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने खेळात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण हे फार काळ होऊ शकले नाही. पराभवानंतर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये बांगलादेशच्या ढाका विद्यापीठात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत, जे मोठ्या स्क्रीनवर सामना पाहत आहेत. एक्सवर शेअर केलेला हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओ कमेंटमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बांगलादेशातील लोक भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय संघाच्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संपूर्ण संघाचे चाहते निराश दिसले. हा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक आले होते. सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. हेही वाचा - World Cup 2023 : “हे टाइप करायला मला थोडा…”; ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.