Team India Playing XI For IND vs ENG 1st T20I: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील पराभवानंतर आता भारताचा संघ इंग्लंडविरूद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रिव्हरसाईड ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांसाठी वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली गेली नव्हती. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वैभवला पदार्पणाची संधी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपली प्लेईंग ११ निवडली आहे.

आकाश चोप्राने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन भारतीय संघाची प्लेईंग ११ निवडली आहे. त्याने पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी वैभव सूर्यवंशीची निवड केली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अभिषेक शर्माची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून त्याने इशान किशनची निवड केली आहे. गेल्या दोन्ही सामन्यात शून्यावर बाद झालेल्या संजू सॅमसनला त्याने आपल्या प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवलं आहे. तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने तिलक वर्माची निवड केली आहे.

टॉप ५ फलंदाजांनंतर सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने शिवम दुबे आणि सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलची निवड केली आहे. आठव्या क्रमांकावर त्याने हर्षित राणाची निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून त्याने अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादवची निवड केली आहे. यासह अक्षर पटेलला साथ देण्यासाठी त्याने फिरकी गोलंदाज म्हणून रवी बिश्नोईची निवड केली आहे.

वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार?

आयर्लंडविरुद्ध झालेल्या दोन्ही टी-२० सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची मागणी जोर धरु लागली होती. पण श्रेयस अय्यरने त्याला दोन्ही सामन्यांमध्ये संधी दिली नव्हती. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी दिली जाणार असल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी आकाश चोप्राने निवडलेली संभावित प्लेईंग ११

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई.