जॅक एडवर्ड्स दुखापतग्रस्त झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ बदली खेळाडूच्या शोधात होता. त्यांच्या रडारवर आरोन हार्डीचं नाव होतं. हार्डी लिलावात अनसोल्ड गेला होता. त्यामुळे हैदराबादला संधी होती. पण त्यांनी डेव्हिड पायनेला घेतलं. हार्डीला पाकिस्तान सुपर लीगमधल्या पेशावर झाल्मी संघाने करारबद्ध केलं. हैदराबादच्या वाटेवर असतानाच हार्डी पेशावरला गेला. त्याच हार्डीने फायनलमध्ये ४ विकेट्स आणि अर्धशतकासह झाल्मी संघाला जेतेपद पटकावून दिलं.
लाहोर इथल्या गड्डाफी स्टेडियमवर विक्रमी ३२,४६१ चाहत्यांच्या साक्षीने हार्डीने झाल्मी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पहिल्यांदाच समावेश झालेल्या हैदराबाद किंग्समेन संघाचा डाव आव्हानात्मक खेळपट्टीवर १२९ धावांतच आटोपला. सईम अयुबने ५४ धावांची एकाकी झुंज दिली. किंग्समेनच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. झाल्मी संघातर्फे आरोन हार्डीने २७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. नाहिद राणाने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना झाल्मी संघाची अवस्थाही डळमळीत होती. भरवशाचा बाबर आझम शून्यावर बाद झाला. मोहम्मद हॅरिस ६ धावा करून तंबूत परतला. कुशल मेंडिस ९ धावांवर बाद झाला. बाबर आणि कुशल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मायकेल ब्रेसवलही ४ धावा करून माघारी परतला आणि झाल्मी संघाची अवस्था ४०/४ अशी होती. पण तिथून आरोन हार्डी आणि अब्दुल समद यांनी पाचव्या विकेटसाठी ६० चेंडूत ८५ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. ४८ धावा करून समद बाद झाला. या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. हार्डीने एकखांबी नांगर टाकत ३९ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ५६ धावांची खेळी केली. अष्टपैलू कामगिरीसाठी हार्डीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. किंग्समेन संघातर्फे मोहम्मद अलीने ३ विकेट्स पटकावल्या पण त्याला सक्षम साथ मिळू शकली नाही.
अफगाणिस्तानच्या रहमनुल्ला गुरबाझने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे झाल्मी संघव्यवस्थापनाने हार्डीला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. २७वर्षीय हार्डीने १५ वनडे आणि १६टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. बिग बॅश स्पर्धेत तो पर्थ स्क्रॉचर्स संघाकडून खेळतो. २०२५ हंगामात हार्डी पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. मात्र त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. पंजाबने त्याला रिटेन केलं नाही.
२०२५ मध्ये कार्बिन बॉश तर यंदा ब्लेसिंग मुझाराबानीने पाकिस्तान सुपर लीगमधल्या संघाशी करारबद्ध असूनही आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोघांवरही बंदीची कारवाई झाली होती. हार्डीही पेशावर झाल्मीची साथ सोडून सनरायझर्स हैदराबादकडे येणार अशी चर्चा होती मात्र तसं झालं नाही. हार्डीने १० विकेट्स आणि १३३ धावा करत झाल्मी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
