AB de Villiers 37 Ball Century World Championship of Legends South Africa Champions: वय हा फक्त आकडा असतो हे वाक्य प्रतिभावान क्रिकेटपटू मैदानावर अनेकदा सत्यात उतरवताना दिसतात. आपल्या ३६० डिग्री फलंदाजीसाठी ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हियर्सने वादळी शतकी खेळी साकारली आहे. एबीने वायाच्या ४२व्या वर्षीही मैदानावर उतरत ३७ चेंडूंत झंझावाती शतक साकारलं. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स स्पर्धेत त्याने ही खेळी साकारली.
एबी डिव्हिलियर्स निवृत्त होऊन बराच काळ लोटला असला, तरी त्याच्या फलंदाजीची ताकद आणि नैपुण्य आजही विलक्षण आहे. शारजाहमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स’मध्ये अवघ्या ३७ चेंडूंत शतक झळकावून त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. एबीने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि त्याच्या आक्रमक खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने अवघ्या १५.४ षटकांत २१० धावांचं लक्ष्य गाठलं.
एबी डिव्हिलियर्स सुरुवातीच्या तीन चेंडूंवर खातंही न उघडता खेळत होता.. सातव्या चेंडूवर त्याने आपला पहिला षटकार खेचला आणि त्यानंतर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने केवळ ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज बेन लॉफलिन आणि केन रिचर्डसन यांचीच चांगलीच धुलाई केली नाही, तर लेग-स्पिनर फवाद अहमदच्या फिरकीची चांगलीच भिंगरी उडवली.
डी व्हिलियर्सने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि पुढील १४ चेंडूंत शतक गाठलं. बेन हिल्फेनहॉसच्या एका चेंडूवर षटकार मारून त्याने आपलं शतक पूर्ण केलं.
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स’मध्ये एबी डिव्हिलियर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजाने स्पर्धेतील आपल्या गेल्या सात डावांमध्ये तीन शतकं झळकावली आहेत, तर या खेळींमध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. केवळ एका डावात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, जिथे तो केवळ सहा धावा करू शकला; त्याव्यतिरिक्त, त्याने प्रत्येक खेळीत आपल्या नावाला साजेशी दणदणीत कामगिरी केली आहे. वयाची ४२ वर्षे पूर्ण झालेली असूनही तो अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत आपल्या नावाची छाप पाडत आहे.
