BLOG – डीव्हिलियर्सने देशापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले का ?

एबी डीव्हिलियर्सने दोन दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. डिव्हिलियर्सचा हा निर्णय तमाम क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का आहे.

संग्रहित छायाचित्र

एबी डीव्हिलियर्सने दोन दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. डीव्हिलियर्सचा हा निर्णय तमाम क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का आहे. कारण डीव्हिलियर्सचा सध्याचा फॉर्म पाहून त्याच्यामधलं क्रिकेट संपलय असं कोणीही म्हणणार नाही. मी आता थकलो असून तरुण खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे म्हणून राजीनामा देतोय असे डीव्हिलियर्सने म्हटले असले तरी अलीकडेच त्याने आयपीएलमध्ये सीमारेषेवर अॅलेक्स हेल्सचा जो अप्रतिम झेल पकडला त्यातून त्याचा फिटनेस दिसून येतो. एकहाती सामना पलटण्याची कुवत असलेला हा गुणवान क्रिकेटपटू अजून एक-दोन वर्ष अगदी सहज खेळू शकला असता.

सध्या सोशल मीडियावर डिव्हिलियर्सच्या राजीनाम्याचे कोडकौतुक सुरु असले तरी त्याच्या राजीनाम्याने मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वर्षभरावर आलेली असताना अशा प्रकारे राजीनामा देऊन डीव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाची खरी पंचाईत केली आहे. कारण डीव्हिलियर्सला पर्याय ठरु शकेल असा खेळाडू दक्षिण आफ्रिकेकडे सोडाच पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही नाही. कारण डीव्हिलियर्स सारखे प्लेअर्स लगेच तयार होत नसतात. वेगाने धावा जमवण्याचे कौशल्य असलेल्या डीव्हिलियर्सच्या फलंदाजीमध्ये एक क्लास होता. त्याची फलंदाजी पाहणे एक नेत्रसुखद अनुभव असतो. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार-षटकार डोळयाचे पारणे फेडतात.

खरंतर दक्षिण आफ्रिकन संघाची गरज लक्षात घेऊन डीव्हिलियर्सने निदान वर्ल्डकप स्पर्धा संपेपर्यंत तरी राजीनामा द्यायला नको होता. कारण ९० च्या दशकातला हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली खेळणारा आफ्रिकेचा संघ आणि आताचा संघ यामध्ये खूप फरक आहे. त्यावेळी आफ्रिकेच्या टीममध्ये सर्वच मॅचविनिंग खेळाडू होते. पण आताच्या टीममध्ये डीव्हिलियर्स आणि एखाद दुसरा अपवाद सोडल्यास आफ्रिकेच्या संघात एकही मॅचविनिंग खेळाडू नाहीय.

डीव्हिलियर्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून राजीनामा दिला असला तरी स्थानिक क्लब क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे आयपीएलसह बिगबॅश आणि अन्य जागतिक लीगमध्ये खेळून तो चांगला पैसा कमावू शकतो. ऑस्ट्रेलियाचे शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन हे खेळाडू सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आज आयपीएलमध्ये खेळत आहेत. डीव्हिलियर्सचा सुद्धा असाच प्लान नाही ना ?, लीग क्रिकेटमधली कारकिर्द वाढवण्यासाठी डिव्हिलियर्सने राजीनामा दिला नाही ना ? असा राहून राहून संशय मनात येतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ab de villiers south africa resign from international cricket

ताज्या बातम्या