Virat Kohli Viral Video: रायपूरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचा शतकी धमाका पाहायला मिळाला. विराटने नाबाद १०५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले.गेल्या २ सामन्यात तो शून्यावर माघारी परतला होता. त्यामुळे या सामन्यात १ धाव घेताच तो सेलिब्रेशन करताना दिसून आला होता. त्यानंतर त्याचा मनीष पांडेसोबतचा चर्चा करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहली गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला होता. पण कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६० चेंडूंचा सामना करत नाबाद १०५ धावांची खेळी केली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ९ वे शतक ठरले. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा आधीपासूनच विराट कोहलीच्या नावे आहे. आता यात आणखी एका शतकाची भर पडली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो मनीष पांडेसोबत चर्चा करताना दिसून येणार आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो रँप शॉट मारण्याची अॅक्टिंग करताना दिसून येत आहे. विराट म्हणाला, “हा, आता मारतो बघ. मला कुठे भारतासाठी खेळायचंय.. आता मी सर्व शॉट मारणार.” स्टंप माईकमध्ये विराटचा आवाज कैद झाला. या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विराट कोहली केवळ भारतीय वनडे संघाचा भाग आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या तो एकच फॉरमॅट खेळत आहे. २०२४ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची फायनल झाल्यानंतर विराटने निवृत्तीची घोषणा केली होती.
त्यानंतर २०२५ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही वनडे संघाचा भाग आहे. दोघेही वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळण्याच्या प्रयत्नात आहेत.
