पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.

सामना सुरु झाल्यानंतर, सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये अभिजीतकडे चांगली आघाडी होती. मात्र किरण भगतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर किरण भगतने काही खास डावपेच आखत अभिजीतला चांगलीच टक्कर दिली. यावेळी किरणला गुण न दिल्यामुळे काहीकाळ किरणच्या प्रशिक्षकांनी आक्षेपही नोंदवला, यावेळी काहीकाळासाठी सामना थांबलेला पहायला मिळाला.

मात्र यानंतर अभिजीत कटकेने सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत किरण भगतला वरचढ होण्याची संधी दिली नाही. किरण भगतच्या तुलनेत अभिजीत हा उंची आणि वजनाने उजवा खेळाडू आहे. याचा फायदा घेत अभिजीतने किरणला चितपट देत अखेर महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही हजेरी लावली होती.