Vinesh Phogat Latest Photo From Paris Olympics 2024: भारताचे दिग्गज नेमबाजी अभिनव बिंद्रा यांनी विनेश फोगट हिची भेट घेतली आहे. विनेशच्या भेटीदरम्यानचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अतिरिक्त वजन असल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे कोणतेही पदक न मिळवता आणि अंतिम फेरीही खेळण्याची संधी तिला मिळाली नाही. या सर्व प्रकरणानंतर विनेश फोगटने ८ ऑगस्टला पहाटे निवृत्ती जाहीर केली आहे. विनेश फोगटसह घडलेल्या सर्व प्रकाराचा भारतीयांना धक्का बसला होताच पण तिच्या या मोठ्या निर्णयानेही मोठा धक्का बसला आहे. या सर्व प्रकरणानंतर अभिनव बिंद्रा यांनी विनेशची भेट घेऊन तिच्यासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. हेही वाचा - Paris Olympic 2024 Live, Day 13 : कुस्तीपटू अमन सेहरावत उपांत्यपूर्व फेरीत, अंशू मलिक बाहेर ५० किलो वजनी गटातील अंतिम फेरीपूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला स्पर्धेतून पूर्णपणे अपात्र ठरवण्यात आले आणि अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी तिला रौप्य पदकही मिळाले नाही. सर्वजण विनेशच्या पहिल्या महिला ऑलिम्पिक पदकाची वाट पाहत होते. या धक्कादायत बातमीनंतर, विनेशला डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जिथे तिला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी भेट दिली होती. माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बिंद्रानेही या कुस्तीपटूला भेट दिली आणि या कसोटीच्या काळात तिचे सांत्वन केले. बिंद्राने विनेशचे तिच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आणि सांगितले की ती भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात नेहमी लक्षात ठेवली जाईल. हेही वाचा - Paris Olympic 2024: ‘विनेश झुंजार प्रतिस्पर्धी; तिच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी’, सुवर्णपदक पटकावल्यानंतर साराची प्रतिक्रिया अभिनव बिंद्राने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रिय विनेश, असे म्हणतात की खेळ हे मानवी इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. माझ्या कारकिर्दीत अनेकवेळा ही बाब खरी ठरली हे मला माहित आहे पण आजच्यापेक्षा जास्त प्रकर्षाने ती कधीच जाणवली नाही. मी आजूबाजूला पाहतोय तर अख्खा देश तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तू कारकीर्दीत घेतलेली मेहनत, सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत केलेली वाटचाल आणि कठीण प्रसंगाला तू ज्या पद्धतीने सामोरे जाते आहेस याचं देशवासीयांना अपार कौतुक आहे. तू एक योध्दा आहेस मग ते मॅटवर असो वा मॅटबाहेर. आपण देत असलेल्या लढ्यामध्ये कधीही हार मानायची नाही, हे आम्ही तुझ्याकडून शिकलो. “तू एक योध्दा काय असतो याला मूर्त रूप दिलं आहेस. सर्व विजय सारखे दिसत नाहीत. काही विजय हे कॅबिनेटमध्ये झळकत असतात परंतु काही विजय हे इतरांना प्रेरणा देणारे असतात जे वर्षानुवर्षे गोष्टींच्या रूपाने पुढच्या पिढ्यान् पिढ्या सांगितले जातात. या देशातील प्रत्येक मुलाला कळेल की तू चॅम्पियन आहेस. प्रत्येक जण तू दाखवलेल्या या resilienceला सामोरे जाण्याची इच्छा बाळगून मोठे होईल. आयुष्याला कणखर निर्धाराने कसे सामोरे जावे याचा वस्तुपाठ तू सादर केला आहेस आणि प्रत्येक मूल तुझ्या या कर्णधार निर्धाराने सर्व अडचणींना सामोरे जात मोठे होईल. यासाठी तुझे आभार." थकलेला चेहरा, सुजलेले डोळे पण तरीही चेहऱ्यावर असलेलं ते स्मितहास्य असा विनेश फोगटचा अभिनव बिंद्रांसोबतचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. अभिनव बिंद्रा यांनी शेअर केलेल्या या फोटोच्या कमेंटमध्ये अनेक चाहत्यांनी तिला निवृत्ती मागे घेत पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी करावी असं तिला समजवा, अशा कमेंट्स केल्या आहेत.