Abhishek Porel Ranji Trophy Century Speech Emotion: बंगालचा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलने रणजी ट्रॉफीच्या क गटातील दिल्लीविरुद्धच्या सुरू असलेल्या सामन्यात सोमवारी नाबाद शतक झळकावलं. शतक पूर्ण केल्यानंतर या डावखुऱ्या फलंदाजाला मैदानावरच अश्रू अनावर झाले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने आपल्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल आणि बलात्कार प्रकरणाबाबत मौन सोडलं.

“मला रडायचं नव्हतं, पण माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. माझ्या सेलिब्रेशनमधून मला काहीही बोलायचं नाही, हा संदेश द्यायचा होता. मला फक्त क्रिकेट खेळायचं आहे. मला प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे, पण ते माझ्या बॅटने,” असं अभिषेक पोरेलने सांगितलं.

तो पुढे म्हणाला, “मी एका वेगळ्या जगात, वेगळ्या विश्वात कसं टिकून राहायचं, हे अनुभवलं आहे. तिथून मी अनेक सकारात्मक गोष्टी शिकलो, ज्यामुळे मी मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर झालो. प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंद मी ज्या परिस्थितीत घालवला, त्याची आठवण फलंदाजी करताना सतत होत होती. मला तोंडाने उत्तर द्यायचं नाही, तर माझ्या बॅटने उत्तर द्यायचं आहे, याची जाणीव मला होत होती.”

दरम्यान रणजी सामन्यात बंगालच्या गोलंदाजांनी दिल्लीचा पहिला डाव २४० धावांत गुंडाळला होता. त्यानंतर सोमवारी पहिल्या डावात फलंदाजी करताना बंगालने दिवसाअखेर ७९ षटकांत ३ बाद ३०४ धावा केल्या. घरामीने २२१ चेंडूंमध्ये नाबाद १२२ धावा केल्या, तर अभिषेक पोरेलने १६१ चेंडूंत नाबाद ११४ धावा झळकावल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १९९ धावांची भागीदारी करत बंगालला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

अभिषेक पोरेलवर नेमके काय आरोप आहेत?

कर्नाटकातील एका तरुण वैद्यकीय विद्यार्थिनीने २३ जून रोजी मोगरा पोलीस ठाण्यात अभिषेक पोरेलविरुद्ध तक्रार दाखल केली होती. संबंधित महिला आणि पोरेल यांच्यात जवळपास साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि दोघांनी लग्न करण्याचंही ठरवलं होतं, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या महिलेनं दोघे एकत्र विदेशात फिरायला गेल्याचंही म्हटलं आहे. मात्र, नंतर पोरेलने त्यांच्यातील संबंध नाकारल्याचा आरोप करत तिने पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रारीनुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला होता, मात्र तेव्हा कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. जूनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोरेलचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं चंदननगर येथील त्याच्या निवासस्थानी अनेकदा गेली, मात्र तो तिथे आढळला नाही.

यानंतर संबंधित महिलेने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने २० जुलै रोजी पोरेलला अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान बलात्काराच्या आरोपांसोबतच गुन्हेगारी स्वरूपाच्या धमक्या आणि इतर काही कथित गुन्ह्यांचाही उल्लेख करण्यात आला.