Abhishek Sharma Fined By BCCI: कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २२६ धावांचा डोंगर उभारला. ज्यात सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या जोडीने मोलाचं योगदान दिलं. ट्रॅव्हिस हेडने ४६ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ४८ धावा केल्या. मात्र, सामना झाल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर दंड आकारला असून १ डिमेरिट पॉईंट देखील दिला आहे. काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या.

अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने अशीच काहीशी आक्रमक सुरूवात करून दिली. त्याने २१ चेंडूत ४८ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार खेचले. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची मन जिंकली. पण वागणुकीमुळे चाहत्यांना निराश केलं. बीसीसीआयकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अभिषेक शर्माने कलम २.३ अंतर्गत ‘लेव्हल १’ चा गुन्हा मान्य केला आहे. हा गुन्हा सामना सुरू असताना मोठ्या आवाजात अश्लील शब्दांचा वापर करण्याशी संबंधित आहे. पण ही घटना नेमकी केव्हा घडली, याचा उल्लेख आयपीएलच्या प्रेस रिलीझमध्ये करण्यात आलेला नाही.

आयपीएलने आपल्या प्रेस रिलीझमध्ये लिहिले, “सनरायझर्स हैदराबाद संघाचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माने गुरूवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. यासह त्याला एक डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे. अभिषेकने अनुच्छेद २.३ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा मान्य केला असून मॅच रेफ्रींनी दिलेला निर्णय मान्य केला आहे.”

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ४८ धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने ४६ धावा केल्या. या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने २२६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडून अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने ३५ धावा केल्या. तर फिन अॅलेनने २८ धावांची खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १६१ धावांवर आटोपला. यासह सनरायझर्स हैदराबादने हा सामना ६५ धावांनी आपल्या नावावर केला.