Abhishek Sharma Double Century: अभिषेक शर्मा काही महिन्यांपूर्वी आयसीसी टी- २० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता. पण त्यानंतर त्याच्या फॉर्ममध्ये घसरण झाली. आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत, इंग्लंड दौऱ्यावर आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पण आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार पुनरागमन केलं आहे. पंजाबमधील जिल्हास्तरीय सिनिअर क्रिकेट स्पर्धेत अमृतसर संघाकडून खेळताना अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ९१ चेंडूंचा सामना करत २३३ धावांची वादळी खेळी केली.

अभिषेक शर्माची वादळी खेळी

अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने अशीच काहीशी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ९१ चेंडूंमध्ये २३३ धावांची वादळी खेळी केली.या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि २५ गगनचुंबी षटकार खेचले. यादरम्यान त्याने २५६.०४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या दमदार खेळीच्या बळावर अमृतसर संघाने ५० षटकांअखेर ८ गडी बाद ५३३ धावांचा डोंगर उभारला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लॉप शो

अभिषेक शर्माने ही वादळी खेळी करुन लक्ष वेधून घेतलं आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट शांत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच झिम्बाब्वेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत त्याला अवघ्या ११ धावा करता आल्या. त्याआधी इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने २६.२ च्या सरासरीने अवघ्या १३१ धावा केल्या. या मालिकेआधी आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याने अवघ्या ४९ धावा केल्या होत्या. या तिन्ही मालिकांमध्ये त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला अभिषेक शर्मा आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

अभिषेक शर्मा टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. तो पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. पण झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत तो एकाच गोलंदाजाविरुद्ध खेळताना बाद होऊन माघारी परतला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुजारबानीने त्याला तिन्ही सामन्यांमध्ये बाद करत माघारी धाडलं. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो झेलबाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो बॅकवर्ड पॉईंटवर झेलबाद होऊन माघारी परतला. तर तिसऱ्या सामन्यात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद होऊन माघारी परतला.