Abhishek Sharma First Fifty in T20 WC 2026: टी-२० क्रिकेटमधील जगातील नंबर वन फलंदाज ठरलेल्या अभिषेक शर्माची टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरूवात एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली. तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर आता अभिषेक शर्माला अखेरीस सूर गवसला. अभिषेक शर्माने भारताच्या झिम्बाब्वेविरूद्ध करो या मरो सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. यासह टीम इंडियाने १० षटकांच्या आत १०० अधिक धावांचा पल्ला गाठला.

अभिषेक शर्मा हा यंदाच्या टी-२० विश्वचषकातील लक्षवेधी खेळाडू होता. पण त्याला पहिल्याच सामन्यापासून जणू ग्रहण लागलं होतं. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये तो सातत्याने शून्यावर बाद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने १५ धावा केल्या. त्यानंतर त्याला प्लेईंग इलेव्हनबाहेर केलं जाईल का अशी चर्चा रंगली होती. पण संघ व्यस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने अर्धशतकी खेळी करत हा विश्वास सार्थ ठरवला.

अभिषेक शर्माचं टी-२० वर्ल्डकपमधील २०२६मधील पहिलं अर्धशतक

अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात २६ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक झळकावलं. झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात संजू सॅमसन व अभिषेक शर्माची जोडी सलामीला उतरली. तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर उतरला. अभिषेक शर्माने चौकारासह या सामन्याला सुरूवात केली. अभिषेक संजू सॅमसनसह पहिल्या विकेटसाठी २२ चेंडूत ४८ धावांची भागीदारी रचली. तर इशान किशनसह दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. तर कर्णधार सूर्यासह त्याने १३ चेंडूत ३० धावांची भागीदारी केली.

अभिषेक शर्मा आपल्या नेहमीच्या अंदाजात चौकार-षटकारासह फटकेबाजी केली. तर प्रसंगी त्याने एकेरी-दुहेरी फटकेदेखील खेळले. यासह १३व्या षटकात अभिषेक ३० चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी करत झेलबाद झाला. त्यापूर्वी संजू सॅमसनने २४ धावांचं व इशान किशनने ३८ धावांचं योगदान दिलं. यासह भारताने पॉवरप्लेमध्येच ८० धावांचा डोंगर उभारला. तर १३ षटकांत संघाने १५० धावांचा पल्ला गाठला होता.

भारतीय संघाला जर सेमीफायनल गाठायची असेल तर त्यांना झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज संघांविरूद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभव केल्याने टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित बिघडलं होतं. त्यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरूद्ध १०० अधिक धावांनी विजय मिळवल्याने टीम इंडिया सुपर-८ मधून बाहेर होणार का असं चिन्ह होतं. पण आता दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिजचा मोठा पराभव केल्याने टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी दोन्ही सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.