Abhishek Sharma Ishan Kishan Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामना रद्द होण्यापूर्वी भारताचा डाव पूर्ण झाला होता आणि भारताने १८९ धावांचा डोंगर उभारला होता. अभिषेक शर्माने २४ चेंडूंत ५९ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताची खराब सुरूवात झाल्यानंतर अभिषेकने श्रेयसच्या साथीने भारताचा डाव सावरला. संजू सॅमसन १ धावेवर बाद झाला आणि त्याच षटकात इशान किशन धावबाद झाला; या घटनेनंतर इशान आणि अभिषेक यांच्यात झालेला संवाद ‘स्टंप माइक’मध्ये कैद झाला, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी सलामीला उतरली होती. संजूने एक धाव काढल्यानंतर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ‘पॉइंट’च्या दिशेने फटका खेळताना तो झेलबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इशान किशन त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला.

इशानने चेंडू हलक्या हाताने खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आधीच क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्याचं लक्षात आल्याने अभिषेक शर्माने धाव घेण्यास नकार दिला. तोपर्यंत इशान किशन अर्ध्या क्रीजपर्यंत पोहोचला होता आणि अभिषेकने नकार देताच इशान मागे परतला आणि त्याने डाईव्ह मारली. पण हॅरी ब्रुकच्या अचूक थ्रोवर इशान रनआऊट झाला होता.

ईशान किशनने ज्या चेंडूवर रन आऊट झाला, तिथे धाव घेणं खरंतर अशक्य होतं, कारण चेंडू थेट क्षेत्ररक्षकाकडे गेला होता. यात अभिषेक शर्माची काहीच चूक नव्हती, कारण त्याने धाव घेण्यास स्पष्टपणे नकार दिला होता; तो ओरडून तसे सांगत होता, पण ईशानने तोपर्यंत धावायला सुरुवात करून चुकला होता. इशान रनआऊट झाल्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला होता आणि त्याने तपालसल्यानंतर इशानला बाद घोषित केलं.

इशान-अभिषेकमधील संवाद

डाईव्ह मारल्याने इशानच्या पोटाजवळ त्याला लागलं होतं आणि पोट धरून तो खाली बसला होता. तितक्यात अभिषेक त्याच्याजवळ येऊन त्याला विचारलं, “तू पोहोचला क्रीजपर्यंत?” इशान म्हणाला, “मला माहीत नाही, खूप क्लोज आहे.” अभिषेकने विचारलं, “अरे ईशान, तू काय करतोय यार?” इशानने उत्तर दिले, “तो चेंडू पुढे होता, धाव घ्यायचा कॉल माझा होता.” अभिषेक म्हणाला, “अरे पण तो कुठे उभा आहे, ते तर बघ.”

आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना शनिवारी ४ जुलैला मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने आता मालिकेतील उर्वरित ४ सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांच्या नजरा असतील.