Abhishek Sharma Fastest 2000 Runs In T20I Cricket: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान या सामन्यातही अभिषेक शर्माने १८ चेंडूंमध्ये वादळी अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठला. यासह वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

अभिषेक शर्माने या डावात फलंदाजी करताना १८ चेंडूंमध्ये वादळी अर्धशतक झळकावलं. यादरम्यान त्याने षटकार खेचून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा पल्ला गाठला आहे. अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वात जलद अवघ्या १०२४ चेंडूंमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सूर्यकुमार यादवने ११६४ चेंडूंमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारे फलंदाज

१. अभिषेक शर्मा (भारत) – १०२४ चेंडू
२. सूर्यकुमार यादव (भारत) – ११६४ चेंडू
३. आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) – १२८३ चेंडू
४. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – १३०४ चेंडू
५. हार्दिक पंड्या (भारत) – १३९० चेंडू
६. टीम सायफर्ट (न्यूझीलंड) – १३९५ चेंडू

भारतीय संघाची पावरप्लेमध्ये दमदार सुरूवात

गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली. पण दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. संजू सॅमसन अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इशान किशन आणि अभिषेक शर्मावर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. दोघांनी मिळून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून ४ षटकात ५० धावा पूर्ण करून दिल्या. तर पावरप्लेपर्यंत संघाची धावसंख्या ८७ धावांवर पोहोचवली.