Abhishek Sharma Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पुढे असलेल्या अभिषेक शर्माने आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही अभिषेक शर्माने दमदार सुरुवात करून दिली. त्याने डावाची सुरुवात करताना १३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. पण त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने अनेकदा आक्रमक सुरुवात करून दिली आहे. आताही त्याने छोटी खेळी केली. पण या खेळीदरम्यान ४ खणखणीत षटकार खेचले. यादरम्यान ३० धावांचा आकडा गाठताच त्याने माजी फलंदाज ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. अभिषेक शर्मा हा आयपीएलमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३० पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने आतापर्यंत १४ वेळेस हा कारनामा केला आहे. तर ख्रिस गेलने १३ वेळेस असा कारनामा केला होता.
कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू फलंदाज सुनील नरेनने हा कारनामा १२ वेळेस केला आहे. तर डेव्हिड वॉर्नरने ११ वेळेस, ट्रॅव्हिस हेडने ९ वेळेस, फिल सॉल्टने ८ वेळेस आणि वीरेंद्र सेहवागने देखील ८ वेळेस हा कारनामा केला आहे.
आयपीएलमध्ये २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक वेळेस ३० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
अभिषेक शर्मा – १४ वेळेस
ख्रिस गेल -१३ वेळेस
सुनील नरेन – १२ वेळेस
डेव्हिड वॉर्नर – ११ वेळेस
ट्रॅव्हिस हेड – ९ वेळेस
फिल सॉल्ट – ८ वेळेस
वीरेंद्र सेहवाग – ८ वेळेस
यासह अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये ८५ डावांनंतर सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने १३७ षटकार खेचले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या केएल राहुलने १३४ षटकार खेचले होते.
