भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध झालेल्या फायनलमध्येही चमकला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनलचा सामना रंगला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने धावांचा आणि षटकारांचा पाऊस पाडला. भारतीय संघाला ज्यावेळी सर्वात जास्त गरज होती, त्यावेळी अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावून ६१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ षटकार खेचले. यासह त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

टी -२० क्रिकेटमध्ये पूर्ण केले ४०० षटकार

अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार मारण्याचा पल्ला गाठला आहे. सर्वात जलद ४०० षटकार मारण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. ख्रिस गेलने ३५५७ चेंडूंमध्ये ४०० षटकार खेचले होते. तर अभिषेक शर्माने ३५१३ चेंडूंमध्ये ४०० षटकार खेचण्याचा पल्ला गाठला आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल अव्वल स्थानी आहे. रसेलने ३०२७ चेंडूंमध्ये ४०० षटकार खेचले होते.

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने शेवटी फलंदाजी करताना ५१ धावा केल्या. त्याला साथ देत शिवम दुबेने २७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद २११ धावा केल्या. पाकिस्तानला गोल्ड मेडलसाठी २१२ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून हसन नवाजने सर्वाधिक ८६ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयापासून १९ धावा दूर राहिला.

याआधी भारतीय महिला संघाने देखील क्रिकेटमध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं होतं. भारतीय संघाने फायनलमध्ये श्रीलंकेचा दारूण पराभव केला होता. आता भारताने विजय मिळवून क्रिकेटमध्ये डबल गोल्ड पटकावलं. हे भारताचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरं गोल्ड मेडल आहे.