Abhishek Sharma Record: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरूवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धूलाई केली. अभिषेकने ३५ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अभिषेक शर्मा हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने पहिल्या चेंडूपासून तुफान फटकेबाजी केली. अभिषेकने २२ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे न्यूझीलंडविरूद्ध कुठल्याही भारतीय फलंदाजाने झळकावलेलं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याला शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण त्याचं शतक अवघ्या १६ धावांनी हुकलं. पण ८२ धावा पूर्ण करताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत.

असा पराक्रम करणारा तिसराच फलंदाज

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात ८२ धावांचा पल्ला गाठताच टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. भारताचा माजी फलंदाज विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधील १६७ डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याने १६४ डावात ४९१७ धावा केल्या होत्या. आता १६५ व्या डावात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम हा केएल राहुलच्या नावावर आहे. केएल राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना १४३ डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या शुबमन गिलने १५४ डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानी होता. पण अभिषेक शर्माने हा विक्रम मोडून काढला आहे. अभिषेक शर्मा हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५००० धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.