SRH vs DC, Abhishek Sharma Century: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मिळून दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी एकूण ९७ धावा जोडल्या. हेड ३७ धावांवर बाद होऊन माघारी परतला. पण त्यानंतर अभिषेकने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान त्याने अवघ्या ४७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
सनरायझर्स हैदराबादकडून डावाची सुरुवात करणारा अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने दमदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेतील हे त्याचं पहिलंच शतक आहे. त्याने डावाची सुरुवात करताना २५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ४७ चेंडूत दमदार शतक झळकावलं. यासह त्याने भारतासाठी सर्वाधिक टी-२० शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
भारतासाठी सर्वाधिक टी -२० शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये अभिषेक शर्मा विराटसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोघांच्या नावे प्रत्येकी ९-९ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर रोहित शर्माच्या नावे ८ शतकं झळकावण्याची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इशान किशनच्या नावे ७ शतकं झळकावण्याची नोंद आहे. संजू सॅमसन आणि केएल राहुल यांनी देखील प्रत्येकी ७-७ शतकं झळकावली आहेत.
पण सर्वात जलद ९ शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने १८४ व्या डावात ९ शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने ४०३ डावात हा कारनामा केला होता. तर रोहितने ४५४ डावात ८ शतकं झळकावली आहेत.
भारतासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज
अभिषेक शर्मा – ९ शतकं (१८४ डावात)
विराट कोहली -९ शतकं (४०३ डावात)
रोहित शर्मा – ८ शतकं (४५४ डावात)
इशान किशन – ७ शतकं (२२७ डावात)
संजू सॅमसन – ७ शतकं (३१९ डावात)
केएल राहुल – ७ शतकं (२३१ डावात)
