Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून अभिषेक शर्माने तुफानी शतकी खेळी केली. त्याला शेवटी हेनरिक क्लासेनची चांगली साथ मिळाली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २ गडी बाद २४२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनीही दमदार गोलंदाजी केली. इशान मलिंगाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दिल्लीचा संघ विज्यापासून ४७ धावा दूर राहिला.

दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी २४३ धावा करायच्या होत्या. सलामीला आलेला पथूम निसांका अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. केएल राहुलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण साकिब हुसेनने त्याला ३७ धावांवर माघारी धाडलं. गोलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या नितीश राणाने फलंदाजीत कसर काढली. त्याने ५७ धावांचे योगदान दिले.

गेल्या सामन्यातील हिरो डेव्हिड मिलर या सामन्यात शून्यावर माघारी परतला. ट्रिस्टन स्टब्सने २७ धावा केल्या. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला आशुतोष शर्मा अवघ्या १४ धावांवर बाद झाला. दिल्लीकडून समीर रिझवीने ४१ धावांची खाकी केली. हैदराबादला २० षटकांअखेर९ गडी बाद १९५ धावा करता आल्या.

हैदराबादने उभारला २४२ धावांचा डोंगर

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी ९७ धावा जोडल्या. यादरम्यान हेड ३७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशनने १३ चेंडूत ताबडतोड २५ धावांची खेळी केली. शेवटी अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेनने मिळून दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ही जोडी शेवटपर्यंत उभी राहिली आणि संघाची धावसंख्या २ गडी बाद २४२ धावांपर्यंत पोहोचवली. अभिषेक शर्माने ४७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्याने ६८ चेंडूत नाबाद १३५ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने अवघ्या १३ चेंडूत ३७ धावा केल्या.