Abhishek Sharma Record, India vs West Indies 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्माने २ चौकार आणि १ षटकार खेचून २० धावा केल्या. पण कमी धावा करूनही त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह त्याने भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
अभिषेक शर्माने पूर्ण केल्या १००० धावा
अभिषेक शर्माने भारतीय टी-२० संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये त्याने दमदार सुरूवात करून दिली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली आहेत. मायदेशात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने १५७७ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने १५३२ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने १५३० धावा केल्या आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली- १५७७ धावा
रोहित शर्मा- १५३२ धावा
सूर्यकुमार यादव- १५३० धावा
इशान किशन- १२४६ धावा
हार्दिक पंड्या – १२१२ धावा
केएल राहुल -१०१८ धावा
अभिषेक शर्मा- १०१० धावा
यासह अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. अभिषेक शर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. आयसीसीच्या फुल मेंबर्स संघातील खेळाडूने पहिल्याच षटकात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रेकॉर्डमध्ये अभिषेक शर्माने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगला मागे टाकलं आहे. याआधी १३ षटकारांसह सर्वाधि षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा पॉल स्टर्निंगच्या नावे होता. आता १४ षटकारांसह अभिषेक शर्मा या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
