Abhishek Sharma Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २२७ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान नितीश कुमार रेड्डीने ३९ धावांची खेळी केली तर हेनरिक क्लासेनने ५२ धावा केल्या. यासह ४८ धावांची खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरूवात केली. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८२ धावा जोडल्या. अभिषेक शर्माकडे मोठी खेळी करण्याची संधी होती. पण तो ४८ धावा करून माघारी परतला. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. या ४ षटकारांसह त्याने षटकारांचं शतक पूर्ण केलं आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघात आधीपासून एकापेक्षा एक धाकड फलंदाज पाहायला मिळाले आहेत. सध्या इशान किशन या संघाचा कर्णधार आहे. काही वर्षांपू्र्वी या संघाचे कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरकडे होते. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळताना सनरायझर्स हैदराबादने जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यावेळी त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना एकूण १४३ षटकार खेचले आहेत. आता सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी १०० हून अधिक षटकार खेचले आहेत. यासह सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
डेव्हिड वॉर्नर- १४३ षटकार
अभिषेक शर्मा- १०१ षटकार
हेनरिक क्लासेन- ९० षटकार
केन विलियम्सन- ६४ षटकार
ट्रॅव्हिस हेड- ५० षटकार
सनरायझर्स हैदराबादने उभारला २२६ धावांचा डोंगर
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर ६ गडी बाद २२६ धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने ४६ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ४८ धावा केल्या. इशान किशनने १४ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ५२ धावांची खेळी केली. शेवटी नितीश कुमार रेड्डीने ५२ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २२६ धावांवर पोहोचवली.
