Abhishek Sharma Fastest T20I Century Record Full Member Nations IND vs AFG: अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात हाहाकार उडवला. प्रेक्षकांनी भरलेल्या अरूण जेटली स्टेडियममध्ये अभिषेक शर्माच्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चौकारा-षटकारांची आतिषबाजी करत अभिषेकने क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. कसोटी सामने खेळणाऱ्या देशांमध्ये अशी कामगिरी करणारा अभिषेक शर्मा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
अभिषेक शर्माने सुरूवातीला फक्त १६ चेंडूत विक्रमी अर्धशतक झळकावलं आहे. यानंतर अभिषेकने फक्त ३० चेंडूत १० षटकार आणि ९ चौकारांसह शतकी खेळी साकारली. यासह अभिषेक हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला.
अभिषेक शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी एस्टोनियाच्या साहिल चौहानने व तुर्कीच्या मुहम्मह फहादने वेगवान शतकं झळकावली होती. पण कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या यादीत सर्वात वेगवान शतकी खेळी साकारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. अभिषेक शर्मापूर्वी झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, न्यूझीलंडचा फिन अॅलन यांनी प्रत्येकी ३३ चेंडूंमध्ये शतकं केली होती. तर डेव्हिड मिलर व रोहित शर्मा यांनी प्रत्येकी ३५-३५ चेंडूंमध्ये शतकं झळकावली होती. पण यांना आता मागे टाकत अभिषेक शर्माने पहिलं स्थान गाठलं आहे.
सर्वात जलद T20I शतकं (कसोटी खेळणारे / पूर्ण सदस्य देश)
३० चेंडू: अभिषेक शर्मा (भारत) वि. अफगाणिस्तान, दिल्ली, २०२६
३३ चेंडू: सिकंदर रझा (झिम्बाब्वे) वि. गाम्बिया, २०२४
३३ चेंडू: फिन ॲलन (न्यूझीलंड) वि. दक्षिण आफ्रिका, २०२६
३५ चेंडू: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) वि. बांगलादेश, २०१७
३५ चेंडू: रोहित शर्मा (भारत) वि. श्रीलंका, २०१७
अभिषेक शर्मा विक्रमी शतकी खेळी साकारल्यानंतर काही वेळाने झेलबाद झाला. अभिषेक शर्माने या सामन्यात ३४ चेंडूत ९ चौकार व ११ षटकारांसह ३१७.६५ च्या स्ट्राईक रेटने १०८ धावांची खेळी साकारली.
