Abhishek Sharma Record: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. हा दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. दोन्ही संघ नंबर १ स्थानी कायम राहण्याच्या प्रयत्नात आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांअखेर ४ गडी बाद २५५ धावांचा डोंगर उभारला आहे. हैदराबादकडून फलंदाजी करताना ३ फलंदाजांनी दमदार अर्धशतकं झळकावली. दरम्यान सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने अर्धशतक झळकवताच मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या हंगामात अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, त्या सामन्यात अभिषेकने वेगवान सुरुवात करून दिली आहे. हा सामना देखील गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्यासाठी हैदराबादसाठी अतिशय महत्वाचा आहे. हेड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या सामन्यातही त्याने अवघ्या २० चेंडूचा सामना करत २५० च्या स्ट्राईक रेटने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह आयपीएलमध्ये २५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये अभिषेक शर्मा अव्वल स्थानी पोहोचला आहे.
अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यात त्याने २२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने ५६ धावांची खेळी केली. त्याने आयपीएल स्पर्धेत ७ वेळेस २५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ५० धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत लखनौचा फलंदाज निकोलस पूरन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ५ वेळेस हा कारनामा केला आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या वैभव सूर्यवंशी, ट्रॅव्हिस हेड आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी ४-४ वेळेस २५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत २५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे फलंदाज
अभिषेक शर्मा – ७ वेळा
निकोलस पूरन – ५ वेळा
वैभव सूर्यवंशी – ४ वेळा
ट्रॅव्हिस हेड – ४ वेळा
कायरन पोलार्ड – ४ वेळा
