Abhishek Sharma Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीत पार पडला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने अविश्वसनीय फलंदाजी केली. न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि १० षटकात एकतर्फी विजय मिळवला. यादरम्यान १४ चेंडूत तुफानी अर्धशतकी खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
अभिषेक शर्मा हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आव्हान कितीही मोठं असो किंवा लहान असो, तो पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळायला सुरूवात करतो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. त्याने २६ चेंडूंचा सामना करत नाबाद ६८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार मारले. अभिषेकने ३४० च्या स्ट्राईक रेटने धावा करत पॉवरप्लेमध्येच आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
अभिषेक शर्मा हा पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक वेळेस अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना ३ अर्धशतकं झळकावली आहेत. या यादीत कॉलिन मुनरो, जॉनसन चार्ल्स, रोहित शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड सारख्या फलंदाजांचा समावेश आहे. या सर्व फलंदाजांच्या यादीत पॉवरप्लमध्ये फलंदाजी करताना प्रत्येकी २-२ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. दरम्यान अभिषेक शर्मा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना ३ वेळा अर्धशतक झळकावलं आहे.
हे आहेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारे फलंदाज
अभिषेक शर्मा- ३
कॉलिन मुनरो- २
जॉनसन चार्ल्स -२
रोहित शर्मा- २
ट्रॅव्हिस हेड- २
यासह अभिषेक शर्माने आणखी एक मोठा विक्रम मोडून काढला आहे. अभिषेक शर्माने या धावा ३४० च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्याने भारतीय संघासाठी खेळताना दुसऱ्यांदा २५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली आहे. यासह त्याने रोहित शर्मा, केएल राहुल, युवराज सिंग आणि हार्दिक पंड्या यांचा विक्रम मोडून काढला आहे. या सर्व फलंदाजांनी प्रत्येकी १-१ वेळा २५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना अर्धशतक झळकावलं आहे. तर अभिषेक शर्मा हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने २५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २ वेळा अर्धशतक झळकावलं आहे.
