Abhishek Sharma Fastest Half Century In ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं आहे. या आमंत्रणा स्वीकार करून भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने मिळून पावरप्लेमध्ये ९२ धावा कुटल्या. यादरम्यान अभिषेक शर्माने या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी अभिषेक शर्माला सलामीवीर म्हणून पहिली पसंती देण्यात आली होती. पण सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये तो आपली छाप सोडू शकला नव्हता. त्याला केवळ १ अर्धशतकी खेळी करता आली होती. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तो २ वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली गेली आणि संघाबाहेर करण्याची मागणी केली गेली. पण सूर्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास ठेवला. अंतिम सामन्यात अभिषेक शर्माने हा विश्वास सार्थ ठरवला.
अंतिम सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने अवघ्या १८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम जेकब बेथेल आणि फिन अॅलेनच्या नावावर होता. दोघांनी १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने पावरप्लेमध्ये ९२ धावा केल्या.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
India Playing XI vs New Zealand: भारत प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
New Zealand Playing XI vs India: न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन
टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी
