Abhishek Sharma Record: अभिषेक शर्मा हा मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने षटकारांचा पाऊस पाडला. संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने इशान किशनसोबत मिळून डाव सावरला. अभिषेकने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ६९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार खेचले. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षांत सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने सूर्यकुमार यादवच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

या सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने ६ गगनचुंबी षटकार खेचले. अभिषेक शर्माने एका कॅलेंडर इयरमध्ये फलंदाजी करताना आतापर्यंत ६८ षटकार खेचले आहेत. हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच वर्षांत कुठल्याही फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. याआधी हा रेकॉर्ड भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. सूर्याने २०२२ मध्ये फलंदाजी करताना ६८ षटकार खेचले होते.

अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

यासह आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच वर्षात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रेकॉर्डमध्ये आता २ भारतीय फलंदाज आहेत. अभिषेक शर्माने २०२६ मध्ये या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. पुढील सामन्यात तो सूर्यकुमार यादवला मागे टाकून सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. या यादीत तिसऱ्या स्थानीही अभिषेक शर्माच आहे. २०२५ मध्ये फलंदाजी करताना त्याने ५४ षटकार खेचले होते.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षांत सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज

अभिषेक शर्मा- ६८ षटकार (२०२६)
सूर्यकुमार यादव- ६८ षटकार (२०२२)
अभिषेक शर्मा- ५४ षटकार (२०२५)
इशान किशन- ५२ षटकार (२०२६)
साहिबजादा फरहान- ४५ षटकार (२०२५)

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २८, नितीश कुमार रेड्डीने २१ आणि अक्षर पटेलने २० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २२३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २०९ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना १४ धावांनी आपल्या नावावर करत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.भारतीय संघाचा विजय