Abhishek Sharma on India Defeat: आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ३४ धावांनी झालेल्या ऐतिहासिक पराभवानंतर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. आयर्लंड संघाने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच भारताला कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत केलं आहे. भारताचा संपूर्ण ताकदीनिशी संघ हा सामना खेळण्यासाठी उतरला असतानाही टीम इंडियाला पराभवाचा मोठा फटका सहन करावा लागला. आयर्लंडच्या गोलंदाजीसमोर वर्ल्ड चॅम्पियन भारताचे फलंदाज फेल ठरले, पण अभिषेक शर्माने मात्र २० चेंडूत अर्धशतक करत संघाला चांगली सुरूवात करून दिली होती.
अभिषेक शर्माने सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाला परिस्थितीशी लवकर जुळवून घेण्यात अपयश आल्याची कबुली दिली. गतविजेत्या भारताला आयर्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये प्रथमच पराभव स्वीकारावा लागला. तसंच, श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची सुरुवातही निराशाजनक ठरली असून, दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे.
‘परिस्थितीशी शक्य तितक्या लवकर जुळवून घ्यायला हवं’ – अभिषेक शर्मा
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला, “संघ म्हणून परिस्थितीशी किती लवकर जुळवून घेतो, हेच सर्वात महत्त्वाचं असतं. सलग सामने खेळताना प्रत्येक खेळाडूने पुढाकार घेत परिस्थितीची सवय करून घ्यायला हवी. सराव सत्रांमधून किंवा मैदानावर उतरल्यावर त्या परिस्थितीशी जुळवून घेणं आवश्यक असतं. मोठा आणि बलाढ्य संघ म्हणून आम्ही शक्य तितक्या लवकर परिस्थितीशी जुळवून घेणं अपेक्षित होतं. आज आम्ही त्याचाच प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ते साध्य झालं नाही.”
आयर्लंडने घडवला इतिहास
सुरूवातीला फलंदाजी करताना आयर्लंडने ९ बाद १८२ धावा करत भारतासमोर १८३ धावांचं आव्हान उभं केलं. कर्णधार लॉर्कन टकरने अर्धशतकी खेळी साकारत डावाला भक्कम पाया दिला. गॅरेथ डिलेनीने ४९ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं, तर जॉर्ज डॉकरेलने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेलं. प्रसिध कृष्णा व वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर आयर्लंडने धावांचा पाऊस पाडत चांगली फटकेबाजी केली.
भारताकडून हर्षित राणाने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी करत ३ बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मात्र, त्यानंतरही भारतीय फलंदाजांना लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नाही आणि आयर्लंडने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
भारताकडून अभिषेक शर्माने १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९ चेंडूत सात चौकार व २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. यानंतर भारताचा एकही फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. तिवक वर्मा, शिवम दुबे व अक्षर पटेल यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. शिवम दुबेने १६ चेंडूत झटपट २५ धावा केल्या, पण त्याची विकेट गेल्यानंतर भारताच्या पुनरागमनाच्या आशा मावळल्या आणि १८.५ षटकांत टीम इंडिया १४८ धावांवर सर्वबाद झाली.
