K Srikkanth On Abhishek Sharma: भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने फ्लॉप ठरतोय. झिम्बाब्वेविरुद्ध सुरु असलेल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांतच राहिली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तो अवघ्या ८ धावा करुन माघारी परतला. २०२६ मध्ये तो आतापर्यंत ९ वेळा फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. यादरम्यान त्याला केवळ १ अर्धशतकी खेळी करता आली आहे. असं असतानाही त्याला सातत्याने भारतीय संघात खेळण्याची संधी दिली जात आहे. यावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ते कृ्ष्णमाचारी श्रीकांत यांनी अभिषेक शर्मावर जोरदार टीका केली आहे.
या मालिकेसाठी सलामीवीर फलंदाज म्हणून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माला संधी देण्यात आली आहे. तर बॅकअप फलंदाज म्हणून प्रभसिमरन सिंगला संधी देण्यात आली आहे. तर अनुभवी फलंदाज संजू सॅमसनला विश्रांती देण्यात आली आहे. याआधी झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला होता. पण फ्लॉप ठरल्यामुळे त्याला डच्चू देऊन त्याच्याजागी वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली गेली होती. पण या दौऱ्यातून त्याला वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसनने भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. या स्पर्धेत त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. पण त्यानंतर त्याला प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं.
के श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “मला अभिषेक शर्माची काळजी वाटते. मला नाही माहीत अचानक त्याला काय झालं. मला खात्री आहे, तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. पण धावा करण्यासाठी त्याला पर्याय शोधावे लागतील. तर दुसरा पर्याय हाच आहे की, त्याने संयम दाखवावा. तो असा खेळाडू आहे, जो कधीही पुनरागमन करु शकतो. तो काहीवेळ १०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करेल आणि अचानक त्याचा स्ट्राईक रेट २०० पार पोहोचतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “वर्ल्डकप स्पर्धेतील काही इनिंस वगळल्या, तर अभिषेक शर्माला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तर सॅमसनने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मालकावीर पुरस्कार पटकावला होता. त्याला संधी का दिली जात नाही? मग अभिषेकला संधी का? अभिषेक शर्माला सातत्याने संधी दिली जात आहे. मग संजू सॅमसनला का नाही? एका खेळाडूला वेगळ्या न्याय आणि दुसऱ्या खेळाडूला वेगळा न्याय, असा भेदभाव का?” अभिषेक शर्मा मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप राहिला आहे. आता तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच्याजागी प्रभसिमरन सिंगला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
